हुंकार बनसोडे
धाराशिव - मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी दिनाच्या एक दिवस अगोदर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असुन औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. उस्मानाबादच्या नामांतराबाबत दोन गट न्यायालयीन लढाई लढत होते.औरंगाबादच्या खंडपीठात हे प्रकरण सुरू आहे.
राज्य सरकारने शनिवारी 15 सप्टेंबर रोजी राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे.त्यामुळे अखेर जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव धाराशिव झाले आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभागाचे नाव आता धाराशिव असणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.
बऱ्याच वर्षांपासून उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न रेंगाळलेला होता. शिंदे सरकार आल्यानंतर याबाबत धाराशिव नावाचा निर्णय घेण्यात आला परंतु या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली होती. धाराशिवच्या विरोधात 28 हजार हरकती दाखल करण्यात आल्या होत्या आणि समर्थनात अवघ्या 175 अर्ज असल्याची माहिती खलील सय्यद यांनी दिली. तसेच हा निर्णय घाई गडबडीत घेण्यात आला असून राज्य सरकारने सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.ते पाळले नाही त्यामुळे आम्ही याबाबत पुन्हा न्यायालयात दाद मागून यावर स्थगिती घेणार असल्याचे खलील सय्यद यांनी सांगितले.