बीड - शहरात गणेशोत्सवादरम्यान घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी तयार होणारे निर्माल्य संकलित केले जाणार असून या निर्माल्यापासून खत तयार केले जाणार आहे. तयार होणारे खत शेतकऱ्यांना मोफत वाटप केले जाणार आहे. बीड शहरातील बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंग, भगीरथ बियाणी सामाजिक प्रतिष्ठान, लोळदगाव बळीराजा कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवातील दहा दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विहिरी, नदीमधील प्रदूषण कमी करण्यासाठी हे पर्यावरणपूरक पाऊल उचलण्यात आले आहे.
बीड शहरात मागील सात वर्षांपासून अनोखा उपक्रम राबवला जात आहे. यंदा पाऊस कमी असल्याने दुष्काळाचे सावट असून गणेशोत्सवातील निर्माल्य नदीत टाकण्यात आले तर आणखी प्रदूषण वाढेल. त्यामुळे या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना निर्माल्य दान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना आणि गणेश मंडळांना निर्माल्य स्वतःहून आणून द्यायचे आहे, त्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. बीड शहरात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीदेखील या उपक्रमाची दखल घेऊन उपक्रमाला सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कृषिभूषण शिवराम घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्याचे खतात रूपांतर केले जाणार असून शेतकऱ्यांना मोफत खत दिले जाणार आहे.
बीड शहरात चार ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्र
शहरातील जिल्हा स्टेडियम जलतरण तलाव, बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंग, दुसरा मजला, बीड, प्रवीण मेडिको, सुभाष रोड, बीड, पवनसुत ऑइल मिल, एमआयडीसी बीड आणि भगीरथ बियाणी डिजिटल कोचिंग, बी.के. कासट कंपाउंड, वृंदावन गार्डनजवळ या चार निर्माल्य संकलन केंद्रांत निर्माल्य देऊ शकता, अशी माहिती बियाणी डिजिटल स्मार्ट कोचिंग क्लासेसचे संचालक प्रवीण बियाणी यांनी दिली.