Advertisement

बीडमध्ये बनावट चष्म्यांचा साठा जप्त

प्रजापत्र | Thursday, 14/09/2023
बातमी शेअर करा

बीड दि.14 (प्रतिनिधी): शहरातील सर्वात वर्दळीचे आणि खरेदीसाठी लगबग असलेल्या सुभाष रोडवरील काही चष्म्यांच्या दुकानात बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आणि चष्म्यांच्या कंपनीच्या प्रतिनिधींच्या वतीने झाडाझडती घेवून अनेक बनावट साठा जप्त करण्यात आल्याची कारवाई गुरूवारी (दि.14) रात्री 7 च्या सुमारास करण्यात आली. सुभाष रोडवरील नामांकित दुकान असलेल्या संकल्प वॉच गॅलरी या दुकानातून रेबन कंपनीच्या बनावट चष्म्यांचा 25 हजारांचा साठा जप्त करण्यात आला. यावेळी नहार कॉम्प्लेक्समधील ‘आय टू आय’ या दुकानात  मात्र एकही बनावट चष्मा आढळून आला नसल्याची माहिती आहे.

 

पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी बनावट चष्म्यांसंदर्भात कारवाईच्या मोहिमा हाती घेतल्याचे चित्र पहायला मिळाले. रेबन कंपनीच्या बनावट चष्म्यासंदर्भात चेतन मोतीराम गणात्रा (वय 43) या पुणे येथील प्राधिकरण अधिकार्‍याने बीडमध्ये बनावट  चष्म्याची विक्री सुरू असल्यामुळे शहर पोलिस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली. त्यानुसार गुरूवारी बीड शहरातील बाजार पेठेत असणार्‍या काही दुकानांवर धाड मारून चष्म्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सारडा कॅपिटल जवळील संकल्प वॉच गॅलरीत रेबन कंपनीचे बनावट चष्मे आढळून आले. 34 चष्मे यावेळी जप्त करण्यात आले असून 25 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुकानाचे मालक प्रतिक सुरेशचंद्र पारख (वय 23, रा.फुलाई नगर) याच्यावर कलम 103, 104, 420 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहरात अचानक सुरू झालेल्या या ‘धाडसत्रामुळे’ खळबळ उडाली होती. सुभाष रोडवरील नहार कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘आय टु आय’मध्ये मात्र तासभर चाललेल्या या तपासणीत एकही चष्मा बनावट पद्धतीचा आढळून आला नाही. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली. ही कारवाई अशफाक इनामदार, श्री सिरसाट, श्री परजणे, श्री पवार यांच्या वतीने करण्यात आली.

 

Advertisement

Advertisement