Advertisement

शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढणार?

प्रजापत्र | Wednesday, 13/09/2023
बातमी शेअर करा

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आधीच संकटात आहे. पावसाअभावी पिकं करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. कांदा, टोमॅटो यासारख्या पिकांना भाव मिळत नसल्याने रस्त्यावर माल फेकण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे.

आधीच अनेक अडचणींनी घेरलेल्या शेतकऱ्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागू शकतो. येत्या काळात खतांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण रशियातील कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी खते भारताला सवलतीच्या दरात देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम भारतातील खतांच्या किमतीवर होऊ शकतो. 

मार्केटमधील किमतींप्रमाणे रशियाने खतांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतात खतांच्या किमती वाढू शकतात. याशिवाय चीनने देखील खतांची निर्यात कमी केली आहे.

मागील काही काळात रशियातून भारतात मोठ्या प्रमाणात खतांची आयात झाली होती. मात्र यापुढे सवलतीच्या दरात खत मिळणार नसल्याने भारताला खत खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना देखील वाढीव किमतीत खत खरेदी करावे लागू शकते. सरकार यामध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का हे पाहावे लागेल.

Advertisement

Advertisement