माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रेला ठिकठिकाणी जनशक्ती यात्रेचे स्वरूप आले. पंकजा मुंडेंनी राजकारणातून दोन महिन्यांचा ब्रेक भलेही जाहीर केला असेल पण त्यांच्यावर प्रेम करणारा सामान्य माणूस त्यांना प्रवाहाबाहेर जाऊ देऊ इच्छित नाही. पंकजा मुंडेंनी देखील स्वत:च्या जिल्ह्यात आल्यानंतर आतापर्यंत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला आणि आपली अस्वस्थता जाहीर केली. पण या अस्वस्थतेवर त्या नेमका उतारा काय शोधणार हे मात्र सांगितले नाही. खूप काही करण्याची क्षमता असतानाही पंकजा मुंडेंचा हा अलिप्तता वादच त्यांच्या राजकारणासाठी अडचणीचा ठरत आहे. काही करायचेच नसेल तर निव्वळ अस्वस्थ होऊन उपयोग तरी काय?
एखाद्या व्यक्तीने राजकारणातून काही काळाचा ब्रेक जाहीर करणे हेच मुळात सामान्यांच्या आकलना पलीकडचे. पण ते पंकजा मुंडेंनी केले. इतर कोणी असे काही पाऊल उचलले असते तर लोकांनी देखील त्याला फार महत्व दिले नसते पण पंकजा मुंडेंची गोष्टच वेगळी. परळी विधानसभा मतदारसंघात चार वर्षांपूर्वी भलेही त्यांचा पराभव झाला असेल पण म्हणून दिवंगत गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारा राज्यभरातला मोठा वर्ग पंकजांपासून दुरावला असे झाले नाही. म्हणूनच राजकारणातून दोन महिन्यांची रजा जाहीर केलेल्या पंकजा मुंडेंनी ज्यावेळी शिवशक्ती यात्रा काढण्याचा मनोदय व्यक्त केला त्यावेळी राज्यभरातून त्याचे स्वागत झाले. त्यांच्या या यात्रेला ठिकठिकाणी मिळणारा प्रतिसाद निश्चितपणे आजही पंकजा मुंडेंचे राजकारणातील महत्व सांगणारा आहे. ज्या परळी मतदारसंघाने चार वर्षांपूर्वी त्यांना पराभवाची चव चाखायला भाग पाडले होते त्या परळीत अगदी मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही लोक पंकजा मुंडेंची वाट पाहत थांबले हे देखील राजकारणात कोणत्याही व्यक्तीचे स्थान काय आहे हे सांगायला पुरेसे असते.
मुद्दा पंकजा मुंडेंच्या लोकप्रियतेचा मुळातच नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी या महाराष्ट्रात बहुजन समाजातील इतका मोठा वर्ग जोडून ठेवलेल आहे की त्याच पुण्याईवर आणखी काही वर्ष तरी पंकजा मुंडेंचे राजकारण आरामात चालू शकते. असेही पंकजा मुंडेंच्या राजकारणाची साारी धाटणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई हीच राहिलेली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना राजकारणात गर्दीची अडचण कधीच येणार नाही. महत्वाचा प्रश्न आहे तो पंकजांची स्वत:ची काय करण्याची इच्छा आहे हा. बीड येथे शिवशक्ती यात्रा आल्यानंतर पंकजा मुंडेंनी आपली अस्वस्थता जाहीरपणे मांडली. यापूर्वी देखील पंकजा मुंडे आपली खदखद व्यक्त करत आलेल्या आहेत. त्या आता पुन्हा एकदा व्यक्त झाल्या. मला गढूळ वातावरणात तुरटीचे काम करायचे आहे इथपासून ते आपल्यावर कोणी कोणी काय काय अन्याय केले हे सारं त्यांनी बोलून दाखवलं. अर्थात पंकजा मुंडे जे बोलल्या ते त्यांच्या कार्यकर्त्यांना माहीत नाही असे नाही. दु:ख सर्वांनाच माहीत आहे. प्रश्न इतकाच आहे की त्या दु:खावर पंकजा मुंडे मार्ग काय काढणार आहेत?
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत असताना ज्यावेळी प्रत्येक जण पंकजा मुंडेंच्या भूमिकेची वाट पाहत होता त्यावेळी पंकजा मुंडेंनी कोणतीच भूमिका घेतली नाही. अगदी आजच नाही तर यापूर्वी ही ज्या ज्या वेळी पंकजा मुंडेंनी काही तरी ठाम निर्णय घ्यावा असे सामान्यांना वाटत होते त्या त्या वेळी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास केला हे वास्तव आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने तलवारी परजायच्या आणि पंकजा मुंडेंनी त्या म्यान करायला लावायच्या असे एकदा नव्हे अनेकदा घडले आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना मदत करू पाहणारे पक्षाबाहेरचे लोकही अनेकदा तोंडघशी पडले. राजकारणात गोपीनाथ मुंडे कायम सर्व पक्षांशी समतोल ठेवून असायचे. विविध राजकीय पक्षात त्यांचे स्वत:चे असे काही लोक होते. एकनाथ खडसे सारख्यांनी त्याच भावनेतून ज्यावेळी पंकजांना काही तरी निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता तो देखील पंकजांनी ऐकला नाही. मग कोणती कृतीच करायची नसेल आणि जे लोक मदतीला तयार आहेत त्यांची मदतही घ्यायची नसेल, बरे त्यांना भाजपमध्येच रहायचे आहे हे जरी मान्य केले तर मग ठामपणे कार्यकर्त्यांना ‘माझे काय व्हायचे ते होईल, भाजपसाठी कामाला लागा’ असे तरी त्यांनी सांगायला हवे. पण तो ठाम संदेशही दिला जात नाही. जर त्याच घरात रहायचे आहे तर मग अन्यायाच्या रडकथांचा उपयोग काय? पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत हे सार्या महाराष्ट्राला माहीत आहे पण त्या अस्वस्थतेला त्या कृतीचा उतारा देणार नसतील तर ही कोंडी फुटायची कशी?