Advertisement

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

प्रजापत्र | Saturday, 19/12/2020
बातमी शेअर करा

मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील परळ ब्रँड म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे शनिवारी सकाळी गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधन समयी ते  71 वर्षांचे होते. अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. 
                        मोहन रावले काही खासगी कामासाठी गोवा येथे गेले होते. तिथे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच रावले यांचे निधन झाले. अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. मोहन रावले हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. दक्षिण मुंबईत शिवसेना रुजवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता.

            आज संध्याकाळी मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आणले जाईल. यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. 

मोहन रावले अखेरपर्यंत परळ ब्रँड शिवसैनिक राहिले- राऊत
मोहन रावले यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही शोक व्यक्त केला. कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त, शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. “परळ ब्रँड “शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. त्याला विनम्र श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement