मुंबई - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झाले. 'सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये बैठक होत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, यावर जरांगे पाटील ठाम आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठकी बोलावली आहे.
जरांगे पाटील यांच्यातर्फे बारा जणांचं शिष्ठमंडळ सह्याद्रीवर आले आहे. गेल्या अकरा दिवसापासून जरांगे पाटील आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. सरकारने निजामकालीन वंशावळीत नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे. पण, मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी पाटील यांनी लावू धरली आहे. आजच्या होत असलेल्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.