Advertisement

20 तास काढला माग आणि शेवटी घातली गोळी

प्रजापत्र | Saturday, 19/12/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहशत माजवलेल्या बिबट्याला अखेर शुक्रवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान ठार मारण्यात आले. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र वनविभागाची ही कारवाई सोपी नव्हती. बिबट्याला जेरबंद करण्याचे अथवा ठार मारण्याचे आदेश मिळाल्यापासून वन विभागाची अनेक पथके बिबट्याच्या मागावर होती, मात्र सर्वांना गुंगारा देणार्‍या बिबट्याचा पक्का माग गुरुवारी सायंकाळी पथकांना मिळाला आणि तब्बल 20 तास धावपळ करीत वन विभागाच्या पथकांनी 500 मीटरचा घेर निश्चित करत बिबट्याचे ’ साईटिंग ’ केले आणि शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास बिबट्याला गोळ्या घालण्यात वनविभागाच्या पुण्याच्या पथकाला यश आले.

 

असा होता शिकार्‍याचा प्रवास
बीड सह नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहशत माजवलेल्या बिबट्याने 16 नोव्हेंबरला  पहिल्यांदा आपेगाव शिवारात शिकार करत एका 50 वर्षीय इसमाला ठार केले होते, त्यानंतर आपेगाव आणि पाथर्डी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला तर 22 ते 29  नोव्हेंबरच्या काळात या बिबट्याने बीड जिल्ह्यात 6 ठिकाणी हल्ले केले यात 3 जण मृत्युमुखी पडले तर तिघे गंभीर जखमी झाले होते. या बिबट्याने करमाळा  तालुक्यातही धुमाकूळ घालणे सुरु केल्यानंतर 6 डिसेंबर रोजी राज्याच्या मुख्य वन संरक्षकांनी या बिबट्याला जेरबंद करणे किंवा ठार मारण्यासाठी आदेश काढले होते. तेव्हापासून वन विभागाची पुणे, औरंगाबाद ,जुन्नर, सोलापूर येथील पथके बिबट्याचा माग काढत होती.बिबट्याला शेवटी करमाळा तालुक्यातील बिटरगाव परिसरात दिसल्याने वनविभागाच्या पथकांनी याच भागाला आपले लक्ष केले होते. बिबट्याला शोधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात होते. मात्र बिबट्या सातत्याने वनविभागाच्या सर्वच पथकांना गुंगारा देत होता.

 

असा लागला माग
करमाळा तालुक्यातील बिटरगावची दोन गावे आणि वांगीची चार गावे हा सारा परिसर म्हणजे निकंदर आणि शहानूरवाडीच्या बॅकवॉटरचा बॅकवॉटरमुळे ऊस आणि केळीचे उत्पादन या परिसरात मोठ्या प्रमाणात होते त्यामुळेच या भागात घुसलेला बिबट्या वनविभागाला सापडायला तयार नव्हता. एकदा बिबट्याने वनविभागाला दर्शन दिले मात्र पुन्हा गुगारा दिला. या प्रकारात एका शेतकर्‍याचा पाच एकर ऊस मात्र जाळून टाकण्यात आला. तरीही बिबट्या सापडत नव्हता. मात्र गुरुवारी सायंकाळी 9.30 च्या सुमाराला वांगी क्र.4 च्या परिसरात बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या पथकानी बिबट्याच्या पायाचे ठसे पाहिले. त्या ठशावरुन माग काढणे सुरु झाले आणि वांगी परिसरातील 500 मिटरच्या परिघातले एक ठिकाण निश्‍चित करण्यात आले. या सर्व पथकांनी मागच्या 20 तासात बिबट्याचा माग काढत 500 मिटरच्या परिघाला घेराव घातला. बिबट्याला अधिकाधिक जवळ कसे आणता येईल हे पाहिले जात होते. यातच बिबट्याचे ‘साईटींग’ पूर्ण झाले आणि धवलसिंह मोहिते हे शार्पशुटर शेतात घुसले त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला आणि मोहिते यांच्या गोळीने बिबट्याच्या नरडीचा शोध घेतला. 16 नोव्हेंबरपासून मानवी रक्ताची चटक लागलेल्या बिबट्याला अखेर 18 डिसेंबरला ठार मारण्यात आले.

 

अशी होती तयारी
इतके झाले तरी बिबट्याला मारणे सोपे नव्हते. कारण बिबट्याला ठार मारणे हा शेवटचा पर्याय होता. अगोदर त्याला जेरबंद करता येते का, बेशुध्द करता येते का हे पहायचे होते आणि काहीच न जमल्यास बिबट्याला ठार मारायचे होते. त्यामुळे वनविभागाच्या वेगवेगळ्या पथकातील सुमारे 150 कर्मचारी उपवन संरक्षक श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. काहींवर बिबट्याला जेरबंद करण्याची जबाबदारी होती तर काही जण त्याला बेशुध्द करण्याच्या कामावर नियुक्त करण्यात आले होते. वनविभागाच्या जोडीला पशुवैद्यकीय अधिकारी देखील तैनात करण्यात आले होते. बिबट्या पाण्यात घुसला तर पोहू शकणारे लोक संरक्षक जॅकेटसह तयार होते. तसेच ऊसात घुसला आणि तेथे घुसण्याची वेळ आली आणि बिबट्यासोबत झटापट झाली तरीही त्याची तयारी असलेले संरक्षक जॅकेट घालून वेगळी पथके तयार होती.

 

पुढे काय?
मागील महिनाभरापासून तीन जिल्ह्यात दहशत माजवलेल्या बिबट्याला ठार मारण्यात आल्याने सामान्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला असला तरी वनविभागासाठी मात्र पुढची कारवाई प्रचंड दक्षतेची असते. कोणत्याही वन्य जीवाला अशा प्रकारे ठार करावे लागल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया किचकट आहे. बिबट्याच्या बाबतीत अगोदर त्याचे स्वॅब घेवून ते सीसीएमबी या प्रयोगशाळेत डिएनए तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. त्या सोबतच बिबट्याचा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या समक्ष पंचनामा केला जाईल त्यात बिबट्याची लांबी, रुंदी, दातांचा आकार, दातांची संख्या, नखे आदींची सविस्तर मोजमापे नोंदविली जातील आणि त्यानंतर वन्यजीव मानद म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या समक्ष वनविभागाचे अधिकारी या बिबट्याला जाळतील.

 

हा बिबट्या तोच का?
बिबट्याला ठार मारल्यानंतर नरभक्षक ठरविलेला बिबट्या हाच होता का? असा प्रश्‍न काहींकडून उपस्थित केला जात आहे. मात्र या प्रश्‍नाचे अंतिम उत्तर मिळायला किमान एक ते दीड महिना लागेल. सीसीएमबीच्या प्रयोगशाळेतून बिबट्याच्या डिएनएचा अहवाल आल्यानंतरच त्यावर अधिकृत शिक्का मोर्तब होईल. मात्र आजच्या घडीला या बिबट्याच्या पावलांचे घेण्यात आलेेले ठसे, त्याची लांबी,रुंदी, बिबट्यांच्या नखाचा आकार आणि बिबट्याचा आढळलेला अधिवास यावरुन हा तोच बिबट्या होता या वनविभागाच्या गृहितकावर विश्‍वास ठेवणे भाग आहे.

 

Advertisement

Advertisement