परीक्षा खरेतर परिक्षार्थ्याचे मूल्यमापन करण्यासाठी असते. आपण कोठे कमी पडतो हे ज्याचे त्याला कळावे आणि सुधारणांना संधी मिळावी, हा त्याचा हेतू. पण शिक्षण क्षेत्रात परीक्षा, गुण आणि अगदी एक दशांशावरुन संधी हुकेल अशी स्पर्धा आणि आपल्या पाल्याने त्या स्पर्धेत धावलेच पाहिजे हा पालकांचा अट्टाहास, यातून आयआयटीयन्स् किंवा 'नीट' धारक घडविणाऱ्या कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अगदी दोन महिने परीक्षा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागत असेल तर आपण कोठे जात आहोत याचा विचार पालकांनीच करायला हवा.
राजस्थानमधील कोटा शहर म्हणजे आता जणू भारताची शिक्षण पंढरी होऊ लागले आहे. उच्च श्रीमंतांना तर या शहराने भुरळ घातलीच,पण अगदी सामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही आपण गावात उपाशी राहू पण लेकराला शिक्षणासाठी कोटा येथेच पाठवू असे वाटू लागल्याचा हा काळ आहे. पूर्वी किमान दहावीनंतर ज्यांना आयआयटी किंवा 'नीट'च्या माध्यमातून भविष्यातील शिक्षणाची वाट चालायची आहे, त्यांंना कोटाची वाट खुणावायची, पण आता ते तेवढयापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. आता तर अगदी पाचवी सहावीपासून पाल्यांना कोटा येथे पाठविण्याची घाई पालकांना झाली आहे.
कोटा येथील शिक्षण पध्दतीवर, तेथील कोचिंग क्लासेसच्या गुणवत्तेवर आम्हाला काही भाष्य करायचे नाही. ती गुणवत्ता जागतिक तोडीची असेलही, पण त्या गुणवत्तेत ऊर फुटोस्तोर धावण्याइतका सक्षम ऊर सामान्य कुटुंबातील पाल्यांचा आहे का? त्यांना ही स्पर्धा जगण्याचे ओझे का घ्यावे वाटतं आहे? कोटा शहरात मागच्या दोन वर्षात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा दोनशेच्या घरात आहे. इतके कोवळे जीव उद्याच्या स्पर्धेत आपल्याला स्थान नाही या न्युनगंडातून जर उद्याची पिढी जीव देवू धजावत असेल किंवा जीव द्यायला मजबूर होणार असेल तर या व्यवस्थेचा आम्हाला कोठे तरी गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
जगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना धावावे लागेल. आयसीएसई, सीबीएसई यांच्या स्पर्धेत राज्यांच्या शिक्षण मंडळाचे विद्यार्थी कमी पडतात हे सारे काही काळासाठी खरे आहे असे मानले तरी या स्पर्धेत धावण्याचे स्वप्न पाल्याचे किती आणि पालकांचे किती? आपल्या अपेक्षांचे ओझे पालक पाल्यांवर किती लादत आहेत? प्रत्येकालाच आपला पाल्य आयआयटीत गेलेला हवा आहे, नाहीतर त्याने 'नीट' क्रॅक केलेली हवी आहे, पण त्याचवेळी अवघ्या देशभरात आयआयटी, जेईई, नीटच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्या कितीतरी अधिक पट विद्यार्थी कोटयात शिक्षण घेत आहेत. उद्या समजा या सगळ्या जागा केवळ कोटयामधील विद्यार्थ्यांनीच मिळविल्या अशी जरी परिस्थिती निर्माण झाली तरी कोटा शहरात येऊन शिक्षण घेणारे ९५℅ विद्यार्थी या स्पर्धेतून बाजूला फेकले जाणार आहेत. मग या विद्यार्थ्यांचे काय? आणि याच भीतीतून मग विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत.
आत्महत्या रोखण्यासाठी कुठे खोल्यांमध्ये स्प्रिंग वाले पंखे बसवा आणि दोन महिने परीक्षा घेऊ नका, असले निर्णय राजस्थान मधील प्रशासन घेत आहे. हे म्हणजे फक्त आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे. पालक जोपर्यंत आपल्या पाल्यांना आयआयटी, जेईई, नीट म्हणजेच केवळ जगण्याची इतिकर्तव्यता नाही, त्यापलीकडे देखील जीवन आहे आणि मुख्य म्हणजे जगणे खुप सुंदर आहे हे शिकविणार नाहीत तोपर्यंत मृत्युचा खेळ थांबणार नाही, आणि हेच शहाणपण आता तरी पालकांना यायला हवे.