बीड जिल्हा असंख्य प्रश्नांचा जिल्हा आहे. शरद पवारांच्या सभेत त्या प्रश्नांवर चर्चा होईल असे वाटले होते. १८ वर्षात प्रथमच त्या सभेला मी नव्हतो. मी सामान्य कार्यकर्ता, पण आमच्या निष्ठेवर शंका घेतल्याच्या प्रचंड वेदना झाल्या. आमच्या निष्ठा पवारांच्या चौकटीवर, त्या दोन चौकटी होऊ देऊ नका अशी विनंती आम्ही खुपदा केली होती. आम्ही निष्ठा कशा विभागायच्या? मग आता अजित पवारांसोबत का रहायचं? तर गेवराई मतदारसंघात गोदावरी खोऱ्यातील बॅरेज, सिंदफणा बॅरेज अजित पवारांमुळे झाले, आज शेतकऱ्यांच आयुष्य बदललय. मग आम्ही अजित पवारांना साथ दिली तर आमचं काय चुकतंय?असा भावनिक सवाल माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केला.
तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरुन आम्हाला निघून जा म्हणाले तरी आम्ही काही बोललो नाही. आम्ही मागं काही बोलत नाही, जे बोलतो ते समोर बोलतो. तुम्ही म्हणता माझे फोटो लावू नका, पण तुमचे फोटो शिवछत्र परिवाराच्या देवघरात आहेत, ते कसे काढणार आहात? त्यासाठी काय कारवाई करणार अशी भावनिक सादही अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांना घातली.
आम्ही आता सिंदफणा खोऱ्यातील ७ बॅरेज, कुसूम योजनेतून १० एचपीच्या मोटरला परवानगी द्या, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला द्या अशी विनंती देखील अमरसिंह पंडित यांनी केली.
भगवानगडाचा कळवळा का?
ज्यांना आजपर्यंत भगवानगड माहित नाही, जे आजपर्यंत कधी भगवानगडावर गेले नाहीत, त्यांना आता अचानक भगवानगड का आठवतोय? कालपर्यंत अजित पवार, धनंजय मुंडे चांगले होते, आज वाईट का झाले असा टोलाही अमरसिंह पंडित यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता लगावला.
--