बीड दि. २५ (प्रतिनिधी ) : बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबादारी स्वीकारलेले सनदी अधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पुन्हा एकदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जबाबदारी आली आहे. जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मागच्या काही वर्षांपासून प्रशासक आहे. या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी काही काळ तत्कालीन अप्पर आयुक्त अविनाश पथक यांनी काम पाहिले होते. याकाळात त्यांनी बँकेला शिस्त लावून रुळावर आणण्याचे काम केले होते . मध्यंतरी मात्र त्यांनीच इच्छा व्यक्त करून या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करून घेतले होते.
आता अविनाश पाठक यांना भारतीय प्रशासन सेवेत नामांकन मिळाले असून काही दिवसांपूर्वीच त्यांची नियुक्ती बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर आता सहकार विभागाने बीड जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळात बदल केले असून अविनाश पाठक यांची प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत प्रशासक मंडळात जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, लेखापरीक्षक बी यु भोसले आणि सहायक निबंधक अशोक कदम यांचा समावेश करण्यात आला आहे
.