महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर तोडगा काढला जावा यासाठी आज राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच या खरेदीसाठी नाशिक आणि नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्याया निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय आपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रतिक्विंटलसाठी दिलेला २४१० हा भाव कमी आहे. कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी आहे. २ हजार ४०० रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही.
शरद पवार पुढे म्हणाले की, सध्याचा कांदा टिकणारा कांदा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहेत. म्हणूनच निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी पवारांनी यावेळी केली.