मुंबई - तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परिक्षार्थी वंचित राहणार नाही, मात्र परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच, यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरळीत पार पडतील, आशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं पाहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता परीक्षा होऊ शकली नाही. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होणेबाबत कळविण्यात आले.
टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा ११.०० वाजता राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रांवर सुरु करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्याना आणि त्याप्रमाणे सर्व परिक्षा केंद्रांवरील परिक्षार्थीना याची सूचना देण्यात आली होती असे मंत्री विखे पाटील यांनी म्हणाले.
राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी आज होणाऱ्या उर्वरीत दोनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी दिलगीरी व्यक्त करून, सदर सर्व्हर डाउन घटनेची चौकशी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत करणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील सर्व परीक्षा वेळापत्रकानूसार सुरळीत पाडण्यासाठी विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे असा दिलासा विखे पाटील यांनी दिला आहे.