पीटीआय, इम्फाळ : संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये नव्याने उसळलेल्या हिंसाचारात, उखरुल जिल्ह्यातील कुकी थोवाई खेडय़ात झालेल्या जोरदार गोळीबारानंतर तीन युवकांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळले. तांगखुल नागांचे प्राबल्य असलेल्या उखरुल जिल्ह्यात अलीकडील हिंसाचाराच्या काळात पहिल्यांदाच असा हल्ला झाला आहे. लिटन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या खेडय़ातून भल्या पहाटे जोरदार गोळीबाराचे आवाज ऐकू आले. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या खेडय़ांत व जंगल भागात शोध घेतला असता २४ ते ३५ वर्षांदरम्यानच्या तीन युवकांचे मृतदेह आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या तिघांच्या शरीरावर तीक्ष्ण चाकूच्या वारांच्या खुणा होत्या आणि त्यांची बोटेही तोडण्यात आली होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ आयोजित करण्यात आल्यानंतर गेल्या ३ मे रोजी राज्यात हिंसाचार उसळला होता. मणिपूरच्या लोकसंख्येत मैतेईंचे प्रमाण सुमारे ५३ टक्के असून ते प्रामुख्याने इम्फाळ खोऱ्यात राहतात. नागा व कुकी यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक असून ते पर्वतीय जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करतात.
मणिपूरमधील कुकीबहुल पर्वतीय भागांसाठी स्वतंत्र मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक देण्याची विनंती राज्यातील कुकी आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्यानंतर, लोकशाहीत प्रत्येकाला मोकळेपणाने बोलण्याचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी शुक्रवारी सांगितले.