Advertisement

चोरीला गेलेले बैल पोलिसांमुळे शेतकर्‍याला मिळाले परत

प्रजापत्र | Thursday, 17/08/2023
बातमी शेअर करा

बीड दि.17 (प्रतिनिधी)ः बीड-गेवराई रोड लगत पेंडगाव शिवारात एका पिकअपमधून चोरीला गेलेले दोन बैल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे परत मिळाले आहेत. पोलिसांनी यावेळी एक पिकअप जप्त केले असून ही कारवाई दि.१७ ऑगस्ट रोजी करण्यात आली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेेच्या पोलिसांमुळे राजाभाऊ सूळ या शेतकऱ्याला मोठी मदत झाली आहे.

 

कृष्णा नवनाथ रूपनर (वय 22), संतोष निवृत्ती भिसे (वय 19), रोहित कटाळू लांडगे (वय 21), रामा रमेश गोरे (वय 21) व सजीम दस्तगिर शेख (वय 22) (सर्व रा.हिवरापहाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राजाभाऊ सूळ या शेतकऱ्याने आपल्या दोन बैल चोरीची तक्रार पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीना पकडले आहे.यावेळी गुन्ह्यात वापरलेले पिकअपही पोलिसांनी जप्त केले असून शेतकर्‍याला चोरीला गेलेले दोन्ही बैल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे परत मिळाले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक तुपे, कैलास ठोंबरे, भागवत शेलार, अशोक दुबाले, नसीर शेख, राहूल शिंदे, विक्की सुरवसे, श्री.जगताप यांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

 

अन शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुलले हसू

आज जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती झाली आहे. पावसाळ्याला तीन महिने उलटल्यानंतर ही जिल्ह्यात पाणीबाणी स्थिती आहे. अश्या परिस्थिती शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेल्यामुळे दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ सूळ यांच्यावर आली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात चोरीला गेलेले बैल संबंधित शेतकऱ्याला मिळवून दिल्याने त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचे पाहायला मिळाले.
 

Advertisement

Advertisement