माझे तुम्हाला आशीर्वाद नाहीत असे सांगायचे, आपल्या वाट वेगळ्या आहेत असे म्हणत राहायचे आणि असे असताना पुन्हा गुप्त भेटी देखील घेत राह्यच्या यामुळे राज्यभरात संभ्रम होत आहे. संभ्रमाचे वातावरण काही काळासाठी ठीक असते, मात्र सातत्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण केल्याने भ्रमालाच वास्तवाचे स्वरूप येत असते. शरद पवारांसारख्या जाणत्या नेत्याला हे माहित नाही असे नाही, पण तरीही शरद पवार असे करीत असतिल तर संशयाला जागा निर्माण होणारच, त्यामुळे आता तरी शरद पवारांनीच हा संभ्रम थांबवायला हवा.
भारतीय राजकारणात स्वतःच्या भूमिकांबद्दल सातत्याने संभ्रम निर्माण करणारे एकमेव नेते म्हणून शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. शरद पवार अनेकदा अनेक बाबतीत मौन पाळतात , अगदी ९० च्या दशकात ज्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अंडरवर्ल्डसोबत संबंधांचे आरोप झाले, त्यावेळी देखील पवारांनी त्यासंदर्भात खुलासे केले नाहीत. एकतर शरद पवार अनेक विषयावर बोलतच नाहीत, किंवा मग जे बोलतात त्याच्या नेमके उलटे करतात हाच आजपर्यंतचा अनुभव राहिलेला आहे. त्यामुळेच शरद पवारांनी एखादी कृती केली, म्हणजे ते निःसंदिग्धपणे तसेच असेल असे म्हणताच येत नाही, इतके शरद पवार यांचे राजकारण अवघड आणि अकल्पित राहिलेले आहे. मात्र आता तो अकल्पीतपणाच शरद पवार यांच्या राजकारणातील अडसर ठरेल का काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर सुरुवातीला हे सारे शरद पवार यांच्याच सांगण्यावरून असेल असेच वाटत होते. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील असे जे चेहरे अजित पवार यांच्यासोबत गेले त्यामुळे शरद पवार यांच्या आशिर्वादाशिवाय हे होऊच शकत नाही असाच कयास महाराष्ट्राने बांधला होता , त्याबद्दलचा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही. एकीकडे अजित पवार गटाकडून सत्तापदांचे आणि इतर अमिश दाखविले जात असताना देखील राष्ट्रवादीमधील अनेकांनी अजूनही शरद पवारांची साथ सोडलेली नाही. अजित पवारांना नाही म्हणणे अवघड असते आणि उद्या त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात हे माहित असतानाही अजूनही अनेकजण शरद पवार यांच्यासोबत आहेत. आणि त्याचवेळी अजित पवार मात्र सातत्याने शरद पवारांच्या सम्पर्कात आहेत. अजित पवारांनी एकदा नव्हे दोन वेळा आपल्या गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना शरद पवारांच्या पायांशी आणून उभे केले, त्या सर्वांना शरद पवारांनी आशीर्वाद देणार नसल्याचे सांगितले असले तरी शरद पवार त्यांची भेट नाकारत नाहीत. यात शरद पवारांची काही राजकीय मुत्सद्देगिरी असेलही, नाही असे नाही, पण सामान्यांना मुत्सद्देगिरी काळात नसते, त्याचे परिस्थितीचे आकलन सामान्य असते. आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक जण 'शरद पवार उद्या काय करतील याचा नेम नाही, ते दोघे पुन्हा एकत्र आले तर आपले काय ? ' असे म्हणत गप्प आहेत, कोणतीही भूमिका घ्यायला ते धजावत नाहीत. अनेकांना शरद पवारांची कुमक करण्याची इच्छा आहे, मात्र 'त्यांचा काय भरवसा ' या एकाच प्रश्नाने महाराष्ट्राचे राजकारण सध्या अधिकाचं अस्थिर केले आहे.
आता शरद पवार पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्यासाठीची त्यातरी देखील सुरु आहे, मात्र हे होण्या अगोदरच शरद पवार आणि अजित पवार यांची बंद दालनात भेट हणार असेल तर लोक चर्चा करणारच. मुळात अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाटा खरेच वेगळ्या झाल्या असतील तर त्यांची विसाव्याची ठिकाणे देखील बदलायला हवीत. वेगळ्या वाटेवरच्या प्रवाशांनी असे एकमेकांना बंद दाराआड भेटायला सुरुवात केली, तर त्यांच्यावरचा अनेकांचा विश्वास दोलायमान होतो. म्हणूनच आता शरद पवार यांनीच यासंदर्भातला संभ्रम दूर करायला हवा. शरद पवार यांच्या कुटुंबात नाते आणि राजकारण या गोष्टी बाजूला ठेवण्याची परंपरा आहे हे मान्य, मुलाचे शेकापचे असलेल्या पवार घराण्यात शरद पवार हे पहिलेच काँग्रेसी , अगदी एकाच घरात राहून शरद पवार आणि इतर पवारांनी वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार केला होता , हा इतिहास महाराष्ट्राला माहित नाही असेही नाही, मात्र कोणत्याही गोष्टीला काळाच्या मर्यादा असतात हे देखील यियकेच मोठे सत्य आहे. एखाद्या काळात जी गोष्ट सहज आणि सामान्य मानली जाते, ती काळ बदलल्यावर तशी मानली जाईलच असेही नाही. म्हणूनच आज जे शरद पवार करीत आहेत, ते कदाचित त्यांच्या अंगवळणी पडलेले असेलही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडणे अवघड आहे. शरद पवार हे लोकोत्तर राजकारणी असतीलही, पण महाराष्ट्रातील कार्यकर्ता सामान्य आहेत, अनेक नेते देखील सामान्य आहेत , त्यांच्या मनातला संभ्रम दूर होणे आवश्यक आहे. त्यासाठीच वेगळ्या वाटेवरच्या प्रवाशांना कोठे आणि किती भेटायचे हे तरी शरद पवारांनी ठरवायला हवे.