Advertisement

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांचा विभागीय कार्यालयावर जन एल्गार मोर्चा

प्रजापत्र | Wednesday, 09/08/2023
बातमी शेअर करा

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी सरकारमध्ये असूनही आज भव्य एल्गार मोर्चा पुकारला. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर 'जन एल्गार मोर्चा' पुकारण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या जन एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी, मजूर लोकं उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचा मोर्चा
आज अमरावतीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचा भव्य मोर्चा पुकारण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून व्हावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी शांततेत आज सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा संत गाडगेबाबा समाधी मंदिर वरून निघला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

 

'सत्तेत असणं म्हणजे मान खाली घालून वागणं नाही'
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, ''आमच नातं जात आणि धर्माशी नाही तर आमचं नात दुःखी लोकांशी आहे. आजच्या मोर्चा इथपर्यंत मर्यादित नाही आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू.'' सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही. प्रश्न सत्तेचा नाही, सत्तेत असणं म्हणजे खाली मान घालून वागणं नाही, असंही त्यांनी म्हटलं. हा मोर्चा हजारोंचा आहे पुढील लाखो लोकांचा असेल. 

 

बच्चू कडू यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं की, ''आता मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आणि जनतेला जागृत करण्याचं काम मी आता करणार आहे. आता लढल्याशिवाय मी राहणार नाही. आता आंदोलन करावं लागेल. आमची युती कोणासोबत नाही झाली तरी, चालेल आता आपली संघटना दहा पट वाढली पाहीजे असं काम करायचं आहे.'' तीन महिन्यात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांना घेऊन आता आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

 

Advertisement

Advertisement