खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महाराष्ट्र काँग्रेसनेही राज्यात पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ ऑगस्टनंतर राज्यातील सहा विभागात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेची जबाबदारी विभागनिहाय नेत्यांवर देण्यात आलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढविण्याची मुभा आहे, त्यानुसार आम्ही पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १६ ऑगस्टनंतर पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यातील सहा विभागांत राबविली जाणार आहे. ता.१६ ऑगस्ट रोजी सुरू होणारी पदयात्रा ३१ ऑगस्टला संपणार आहे.
विभागानुसार प्रत्येक नेत्यांवर या पदयात्रेची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यात काँग्रेसचे प्रभारी नाना पटोले यांच्यावर पूर्व विदर्भाची, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या पदयात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात ही पदयात्रा निघणार आहे. विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे उत्तर महाराष्ट्रात जबाबदारी सांभाळणार आहेत. मुंबईत माजी मंत्री वर्षा गायकवाड ह्या या पदयात्रेचे नेतृत्व करतील. कोकणात मात्र काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते मैदानात उतरणार आहेत.
ही पदयात्रा बसमधून केली जाणार आहे. त्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या कामांची पोलखोल केली जाणार आहे. प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, त्यानुसार आम्ही ही पदयात्रा काढत आहोत. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा असेल, ते केली जाईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले.