मुंबई - बीड जिल्हापरिषदेचे वादग्रस्त सीईओ अजित पवार यांची अखेर उचलबांगडी झाली असून जिल्हापरिषदेचे सीईओ म्हणून अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाठक यांची नुकतीच भारतीय प्रशासन सेवेत निवड झाली आहे.
बीड जिल्हापरिषदेचे सीईओ अजित पवार अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरु होत्या. त्यातच आता त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश पाठक हे मुळचे महसुल सेवेतील अधिकारी होते. त्यांनी बीड जिल्हयात निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच जिल्हा बॅंकेवर प्रशासक म्हणून देखील काम केले आहे. त्यांना नुकतेच भारतीय प्रशासन सेवेत नामांकन मिळाले असून आता त्यांची बीड जिल्हापरिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.