Advertisement

शांत बसा नाहीतर तुमच्या घरी ED येईल

प्रजापत्र | Friday, 04/08/2023
बातमी शेअर करा

दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू असून त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर आले आहेत. या विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजपच्या दिल्लीतील खासदार आणि केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी विरोधकांना थेट ईडीचीच धमकी दिली आहे. शांत बसा नाहीतर तुमच्या घरी ईडी येईल अशी जाहीर धकमी, तीही लोकसभेच्या चर्चेदरम्यान त्यांनी दिली. मिनाक्षी लेखी यांच्या या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. 

बुधवारी आणि गुरुवारी लोकसभेत दिल्ली सेवा विधेयकावर जोरदार चर्चा झाली. दरम्यान, या विधेयकावर विरोधक गदारोळ करत असताना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, ईडी तुमच्या घरी येऊ नये म्हणून शांत राहा. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत.

दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कमी करण्यासंबंधी आणि ते केंद्राच्या हाती घेण्यासंबंधीत दिल्ली सेवा विधेयका 2 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावर बोलण्यासाठी उभे राहताच संपूर्ण विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी या विधेयकावर पुन्हा चर्चा झाली.

 

मीनाक्षी लेखी संसदेत काय म्हणाल्या?
गुरुवारच्या चर्चेदरम्यानही विरोधी खासदारांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर बोलताना केंद्रीय मंत्री मीनाक्षी यावर विरोधकांना उद्देशून म्हणाल्या की,  "...एक मिनिट, एक मिनिट. शांत राहा नाहीतर ईडी तुमच्या घरी येईल."

 
ही धमकी की इशारा? काँग्रेसचा सवाल
मिनाक्षी लेखी यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो म्हणाले की, भाजप खासदाराच्या वक्तव्याने केंद्र सरकार तपास एजन्सीचा गैरवापर करत असल्याच्या विरोधी नेत्यांच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले म्हणाले की, मंत्री आता उघडपणे विरोधी पक्षनेत्यांवर ईडीचा वापर करण्यास सांगत आहेत. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी संसदेत विरोधकांना धमकी दिली त्यावेळी आश्चर्य वाटलं. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांनीही मिनाक्षी लेखी यांचे वक्तव्य म्हणजे इशारा की धमकी, असा प्रश्न उपस्थित केला. 

 

Advertisement

Advertisement