विधीमंडळ अधिवशनाच्या आज (४ ऑगस्ट) शेवटच्या दिवस असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांसंबंधीची माहिती सभागृहात दिली. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमाक देशात तिसरा नसून १०वा असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांच्या अपहरणांसंबंधी आकडेवारी देखील विधान परिषदेत सांगितली.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपण समज तयार करण्याचा प्रयत्न करतोय की राज्यात दररोज ७० मुली गायब होतायत, महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीयेत, हे खरं नाहीये. आपण याचा विश्लेषण केलं, तेव्हा अनेकवेळा ज्येष्ठ महिला घरून निघून गेलेल्या असतात. काही घरची कारणं असतात, त्याची तक्रार होऊन पोलिस त्यांना घरी आणतात असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र देशात १०व्या क्रमांकावर
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, मुंबई इतर मोठ्या शहराच्या तुलनेत महिलांना सुरक्षित वाटते. महिला रात्री-अपरात्री येथे प्रवास करतात. सांगितलं गेलं की, महाराष्ट्र गुन्हांमध्ये तीसरा आहे. पण महाराष्ट्र मोठा असून राज्याची लोकसंख्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा विचार करता एक लाख गुन्ह्यांमध्ये महराष्ट्रात भारतीय दंड संविधानाच्या गुन्ह्याचं प्रमाण २९४.३ इतकं आहे. यानुसार महाराष्ट्राचा क्रमांक देशात १०वा आहे ,अशी माहिती फडणवीस यांनी दिली. २०२३ च्या अखेर दाखल गुन्ह्यांची मागील वर्षांशी तुलना केली तर त्यामध्ये ५४०० गुन्ह्यांची घट आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महिला गायब होण्याच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महिला आणि बालक गायब झाल्यावर काही निर्बंध टाकले आहेत. उदाहरणार्थ अशा प्रकरणांमध्ये ७२ तासांत त्याचे एफआयआरमध्ये रुपांतर करावे लागते आणि अपहरण झालं आहे असं समजून त्याची चौकशी करावी लागते, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बाल लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र १७ वा
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, महिला आणि बालकांवरील अत्याचारात महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे. असाम, दिल्ली, ओडिसा, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान, अंदमान निकोबार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. तर बाल लैंगिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र १७ वा आहे.
महिला असुरक्षित असं काही नाही
महिला गायब होतात यामागे वेगवेगळी कारणे आहेत, काही निघून गेलेल्या असतात काही पळून गेलेल्या असतात. २०२१ साली अशा प्रकरणात परत आलेल्या, सापडलेल्या किंवा सोडवलेल्या महिलांची संख्या ८७ टक्के आहे. त्यानंतर २०२२ मध्ये आतापर्यंत ती ८० टक्के आहे.२०२३ जानेवारी ते मे याकालावधीत ६३ टक्के घटना उघडकीस आल्या आहेत आणि त्यांना परत आणलं आहे, हा आकड येत्या काळात ९० टक्क्यांपर्यंत जाईल. देशात महिलांना परत आणण्याची सरासरी इतर राज्यांपेक्षा महराष्ट्राची १० टक्के जास्त आहे असे देवेंद्र फडणीस म्हणाले.
२०१५ पासून जवळपास ३४ हजारापेक्षा जास्त बालकं त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यात आली आहेत. २०२१ साली मिळून आलेल्या बालकांची टक्केवारी ९६ टक्क्यांवर २०२२ ची ९१ टक्क्यांवर आणि आत्ताची २०२३ ची ७१ टक्क्यांवर पोहचली आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले. अपहरणांच्या प्रकरणात देखील देशात महाराष्ट्राचा क्रमांक १० वा असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे आपण समज तयार करण्याचा प्रयत्न करतोय की राज्यात दररोज ७० मुली गायब होतायत, महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीयेत, हे खरं नाहीये, असे फडणवीस म्हणाले.