Advertisement

बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात मिळाला दुसरा सरपंच

प्रजापत्र | Thursday, 03/08/2023
बातमी शेअर करा

भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली. मोठे प्रवेश, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीतील मेळावे, दौरे यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतांनाच आता ग्रामीण भागातून या पक्षाने सत्तेत चंचू प्रवेश केला आहे. गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ ग्रामपंचायतीत सरपंचपदी बीआरएसच्या महिला सदस्याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

यापुर्वी गंगापूर तालुक्यातीलच सरपंच सावखेडा ग्रामपंचायत सरपंचपदी सुषमा मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता  महाराष्ट्रातील बीआरएसच्या सरपंचांची संख्या दोन झाली आहे. आज मौजे अंबेलोहळ ता.गंगापुर येथील ग्रामपंचायत मध्ये भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विकासावर विश्वास ठेवून पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अण्णासाहेब माने त्यांचे चिरंजीव संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील दुसऱ्या सरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

प्रतिभा राजेश दाभाडे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. दोन महिन्यापुर्वीच बीआरएसने महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीमध्ये खाते उघडले होते. बीआरएसच्या पहिल्या सरपंच म्हणून गंगापुर तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुषमा विष्णू मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात दणक्यात प्रवेश केलेल्या बीआरएसला ग्रामपंचायतीत देखील या निमित्ताने सत्ता मिळाली आहे.

 

तेलंगणा पॅटर्न आणि अबकी बार किसान सरकार, अशी घोषणा देत केसीआर आणि राज्यातील त्यांच्या पक्षाचे नेते विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. गंगापूर तालुक्यातील माने-पिता पुत्रांनी केसीआर यांच्या मार्गदर्शनाखाली बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य समितीत देखील माने यांना स्थान देण्यात आले. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात माने यांचे वर्चस्व आहे.

 

अण्णासाहेब माने यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तर संतोष माने यांनी देखील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मते मिळवली होती. आता महाराष्ट्रात बीआरएसला ग्रामीण भागातून सत्तेत बसवण्याचे श्रेय देखील माने पिता-पुत्रांना जाते. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत के. चंद्रशेखर राव यांनी ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या, असे आवाहन केले होते. गंगापूर तालुक्यातून बीआरएस पक्षाला दोन ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली आहे.

Advertisement

Advertisement