मुंबई - मुंबईत आज बुधवार, 2 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. चर्चगेट इथल्या एमसीए लाऊन्जमध्ये रात्री साडेसात वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती या बैठकीचे संयोजक आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
हे नेते राहणार उपस्थित
या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी,शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत देशभरातील अनेक विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येत आहेत. विरोधकांच्या या आघाडीचं नाव इंडिया असं ठेवण्यात आलं आहे. विरोधकांची तिसरी बैठक पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीमुळे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक महत्त्वाची समजली जात आहे.