विषवल्ली कितीही गोंडस दिसत असली आणि तिची पाळेमुळे कितीही खोलवर रुजलेली असली , अगदी सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचली असली, तरी ती समाजासाठी कायमच घातकच असते. म्हणूनच विषवल्ली फारशी फोफावण्यापूर्वीच उपटून टाकायची असते, लहान असताना विषवल्ली उपटणे जमले नाही तर त्याचा विखार पसरविणारा वृक्ष होतो आणि तो सामाजिक सौहार्दाला घातक असतो. आज संभाजी भिडेचें तेच झाले आहे. सत्तेच्या आशीर्वादाने हा व्यक्ती हवे तसे बरळतो आणि देशात विष पसरविण्याचे काम करतो हे वारंवार समोर आल्यानंतरही त्याच्यावर कारवाई होत नाही. हे समाजाच्या भविष्यासाठी घातक आहे. असल्या विषवल्ली कोणत्याही वेळी उपटूनच टाकल्या पाहिजेत.
महाराष्ट्राला संत , महंत , प्रबोधनकारांची मोठी परंपरा आहे. तसेच सामाजिक सौहार्द जपत आदर्श राज्यकारभार कसा असावा हे दाखवून देणारी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शाहू महाराजांपर्यंतची उदाहरणे याच महाराष्ट्राच्या मातीतली आहेत. त्याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाव घेणारे लोक जर विष आणि विखार पसरविण्याचे काम करीत असतील तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा देखील अवमान ठरतो. आज महाराष्ट्रात संभाजी भिडे नावाचे गृहस्थ तेच करीत आहेत. संभाजी भिडे यांचे भक्त म्हणतात तसा संभाजी भिडे या व्यक्तीचा देशासाठी, समाजासाठी त्याग असेलही. त्यांचे या वयातही पायी चालणे, बसने चालणे , त्यांना नसलेला संपत्तीचा मोह, त्यांची कथित पदवी कितीतरी मोठी असताना त्यांनी कथित प्रबोधनाचा निवडलेला मार्ग हे सारे सामान्यांच्या कक्षेपलीकडचे असेलही , पण म्हणून त्या व्यक्तीलास महाराष्ट्राच्या , देशाच्या अस्मितांबद्दल काहीही बोलण्याचा, समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचा आणि बहुजन प्रेरणा हायजॅक करण्याचा अधिकार मिळतो असे नक्कीच नाही.
मात्र मागच्या काही वर्षात , विशेषतः देशात आणि राज्यात भाजप सत्तेच्या सोपानावर चढल्यानंतर संभाजी भिडेंचा वाचाळपणा अधिकच वाढला आहे. यापूर्वीही संभाजी भिडेंची ओळख होती ती एकांगी इतिहास सांगून तरुणाईची माथी भडकविणारा म्हणूनच , पण याबाबतीत त्या व्यक्तीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणमा किंवा त्यांचे इतिहासाचे आकलनच तसे असेल असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येईलही . पण समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचा जो उद्योग भिडे करीत आलेले आहेत, तो कोणत्याच समाजाला शोभणारा नाही. साऱ्या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पंढरपूरच्या वारीत धारकरी घुसविण्याचा उद्दामपणा जर दुसऱ्या कोणी केला असता तर राज्यातल्या भाजपेयीनीं आभाळ डोक्यावर घेतले असते. त्यानंतरही महाराष्ट्रातील आणि देशातील महापुरुषांबद्दल संभाजी भिडे जो विखार पेरीत आहे, आणि जी मुक्ताफळे उधळीत आहे, ती संतापजनक आहेत. अगदी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस मानायचे नाही असे भिडे म्हणतो आणि तरीही हे विधान सरकारला देशद्रोही वाटत नाही, त्याच्यावर कारवाई करण्याची हिम्मत सरकार दाखवीत नाही, अशातूनच संभाजी भिडे सारख्या प्रवृत्तीला विखार पसरविण्यासाठी अधिकच चेव सुटत सरो.
आताही महात्मा गांधींच्या वडिलांच्या संदर्भाने ते मुस्लिम होते आणि इतर काही आक्षेपार्ह विधाने बिहडेंनी केली आहेत. महात्मा गांधींच्या संदर्भाने स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या विचारधारेत किती द्वेष आहे हे काही लपून राहिलेले नाही, त्यामुळे भिडे असले काही बोलतो यात अनपेक्षित काहीच नाही. गांधी, नेहरू आदींबद्दल गरळ ओकल्याशिवाय या लोकांना काहीच पचन होतच नाही, त्यामुळे ते प्रवृत्तीनुसार वागत आहेत , पण सरकार त्याला कायदेशीर प्रकृतीनुसार उत्तर का देत नाही ? भिडे भलेही सत्तेतील अनेकांना गुरुस्थानी असतीलही, पण म्हणून त्यांनी काहीही वाचाळपणा करायचा आणि सत्तेने तो सहन करायचा असेच काही ठरले आहे का ? देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींना महात्मा गांधींची असली बदनामी मान्य आहे का ? आणि नसेल तर असली विषवल्ली उपटून टाकण्यासदंर्भात ते एकही निर्देश देणार आहेत का ?