Advertisement

बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

प्रजापत्र | Monday, 24/07/2023
बातमी शेअर करा

बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून टोळीतील सात जणांना बार्शी शहर पोलिसांनी अटक केली आहे. मिरगणे कॉम्प्लेक्स गाळ्यातील व्यापाऱ्यांकडे दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती 19 जुलैला बार्शी शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं. 

 

सुनील चंद्रसेन कोथिंबिरे (वय 23, रा. माळी नगर, अंबाजोगाई, जि. बीड) आणि आदित्य धनंजय सातभाई (वय 22 रा. स्टेशन रोड, गांधी मार्केट, परळी वैजिनाथ जि. बीड) या दोघांना शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. या संशयित आरोपीकडे दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर खदीर जमाल शेख (वय 31 रा. मिरवट, ता. परळी, जि. बीड), विजय सुधाकर वाघमारे (वय 32, रा. स्टेशन रोड, गांधी मार्केट, परळी, जि. बीड) यांच्याकडून या नोटा घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे सहा हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढलून आल्या. त्यामुळे पोलिसांनी यांना देखील अटक केली.

 

या आरोपीची चौकशी केली असता त्यांनी या बनावट नोटा नितीन ऊर्फ आप्पा जगन्नाथ बगाडे (वय 50, रा. शामगाव, ता. कराड, जि. सातारा), जमीर मोहमंद सय्यद (वय 40, रा. नाशिक रोड, सिन्नर फाटा, नाशिक) यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. मात्र आतापर्यंत या नोटा कुठे छापण्यात येतात याची माहिती पोलिसांनी मिळाली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतेलेल्या या सर्व आरोपीची कसून चौकशी केली.

 

तेव्हा या बनावट नोटा मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटी गावच्या तरुणाच्या घरात या नोटा प्रीटिंग करत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ येथील ललित चंद्रशेखर व्होरा (वय 26, रा. चिंचोलीकाटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी तेथे 80 हजार रुपयांच्या नोटा, एच. पी. कलर प्रिंटर, कटर, पट्टी, कागदावर बनवलेल्या अर्धवट नोटा तसेच नोटा बनवण्याचे इतर साहित्य सापडले. त्यामुळे पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त करत आरोपी ललित व्होरा याला देखील अटक केली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी जवळपास 4 लाख रुपयांचा नोटा जप्त केल्या आतापर्यंत 7 आरोपीना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

अटक केलेल्या सात पैकी तिघे आरोपी हे बीड जिल्ह्यातील परळीचे आहेत. एक आरोपी अंबेजोगाईचा, एकजण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याचा, एकजण नाशिक जिल्हा आणि एकजण मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटीचा असे वेगवेगळ्या जिल्ह्यातील आरोपी असल्याने त्यात आणखी कितीजण सामील आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.

Advertisement

Advertisement