Advertisement

प्रसिद्ध अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

प्रजापत्र | Monday, 24/07/2023
बातमी शेअर करा

मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती.

 

सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. ३० हून अधिक अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.

 

वेगवेगळ्या भूमिकांसाठी जयंत सावरकर यांची ओळख होती. त्यांनी विनोदी, गंभीर भूमिकांमधून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अभिनेता जयंत सावरकर मागील 15 दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. जयंत सावरकर यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात निर्माण झालेली पोकळी ही भरुन न येणारी आहे.

जयंत सावरकर यांच्या लोकप्रिय भूमिकांविषयी सांगायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ते 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसले होते. याबरोबरच 'समांतर' या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली ज्योतिषाची भूमिकाही विशेष गाजली होती. सोशल मीडियावरुन जयंत सावरकर यांना चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आदरांजली वाहिली आहे. यावेळी अनेक मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला.वयाच्या 20 व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), एकच प्याला (तळीराम) सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. त्या वेगवेगळ्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले.

Advertisement

Advertisement