अंबाजोगाई - बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई हा स्वतंत्र जिल्हा जाहिर करावा, अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी शुक्रवार, दि. 21 जुलै रोजी विधानसभेत पावसाळी अधिवेशनात केली.
मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेत लक्षवेधीद्वारे आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करण्याची मागणी केली. यावेळी आ.मुंदडा म्हणाल्या की, समाज माध्यमातून आम्ही पाहत आहोत, वाचत आहोत, की राज्यात काही जिल्ह्यांची विभागनी करून नविन जिल्हा निर्मितीचे काम सुरू आहे. माझ्या केज विधानसभा मतदार संघात बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करावा, अशी येथील नागरिकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीसाठी अंबाजोगाईकर मागील 35 वर्षांपासून निवेदने, निदर्शने, आंदोलने करून विविध माध्यमातून लढा देत आहेत. तरीही या मागणीचा शासन दरबारी आज पावेतो गांभीर्याने विचार झाला नाही. दरम्यान, या मागणीसाठी माझ्या सासुबाई व राज्याच्या तत्कालीन मंत्री स्व.विमलताई मुंदडा यांनी अंबाजोगाई जिल्हा व्हावा या करिता सतत पाठपुरावा केला. विविध आंदोलनात सहभाग घेतला, आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्यानंतर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पुरक असणारे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूसंपादनाची तीन कार्यालये अंबाजोगाईत कार्यान्वित झाली. ही सर्व कार्यालये आज स्वतंत्र व सुसज्ज इमारतीत उभी आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी आवश्यक असारे सर्व प्रकारचे इंफ्रास्ट्रक्चर अंबाजोगाईत उपलब्ध असून अंबाजोगाई हा नविन जिल्हा निर्माण करण्यासाठी शासनाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. तर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी लागणारा अतिरिक्त खर्च आपोआप कमी होणार आहे. अंबाजोगाईकरांच्या वर्षानुवर्षे होत असलेल्या मागणीला न्याय द्यावा आणि लवकरात लवकर बीड जिल्ह्याचे विभाजन करून नविन अंबाजोगाई जिल्हा निर्माण करावा अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी मुंबईत सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून केली. ही माहिती अंबाजोगाई शहर व तालुक्यात कळताच जनतेतून त्याचे स्वागत होत आहे. अनेकांनी यासाठी आ.नमिता मुंदडा यांना धन्यवाद दिले आहेत.