मोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने गुजरात सरकार आणि भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावली आहे. त्यांना या प्रकरणी दहा दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ही आता ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
गुजरातच्या सुरत न्यायालयाने या प्रकरणी राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात राहुल गांधींनी आधी सुरत न्यायालयात आणि नंतर गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली, मात्र त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला नाही.
७ जुलै रोजी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने १८ जुलै रोजी गांधींच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्या बाजूने उपस्थित राहून या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली.
प्रकरण काय आहे?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकात एका सभेत बोलताना मोदी आडनावावरून एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती. या प्रकरणी गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निकालानंतर २४ मार्च रोजी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीनुसार राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले.