बीड - अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने बीडसह नेकनूर, उस्मानाबादेतील ईट येथील हजारो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बीड, नेकनूर पोलीस ठाण्यात अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून गुरुवारी (दि.20) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी (एसआयटी) विशेष तपास पथक नेमले आहे. त्यासाठी प्रमुख म्हणून सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची निवड करण्यात आली आहे.
जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या देखरेखखाली निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक भारत बरडे, अमलदार मुकुंद तांदळे, अभिमान भालेराव, श्रीकृष्ण हुरकुडे, भाऊसाहेब चव्हाण, संजय पवार हे तपास करत आहेत. दरम्यान याप्रकरणात योगेश करांडे पोलीस कोठडीत असून आज कोठडीचा शेवटचा दिवस आहे. कोठडीत वाढ होणार की, न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार याकडे लक्ष लागले आहे.
असा आहे तपास सुरू
या प्रकरणात गुन्हा दाखल होताच अध्यक्षा अनिता शिंदे स्वतः पोलीसांना शरण आल्या, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. नंतर योगेश करांडेंना अटक करण्यात आली ते पोलीस कोठडीत असून आज कोठडीचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत पोलीसांनी जवळपास 1300 ठेवीदारांचे जवाब नोंदवले आहेत. मात्र पोलीसांना ना संचालक मंडळाचा तपास लागला, ना शिंदेंच्या प्रॉपर्टीचा, फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.