आष्टी/पाटोदा - आष्टी आणि पाटोदा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. नगराध्यक्षपदाची मुदत अडीच वर्षाची असून पक्षीय पातळीवरील निर्णयाप्रमाणे सव्वा वर्षाची संधी प्रत्येकाला देण्याचे ठरल्यानंतर आ.सुरेश धस यांच्या आदेशानुसार आष्टी आणि पाटोदा येथे नगराध्यक्षपदासाठी बुधवार दि.१९ जुलै रोजी अर्ज भरण्याच्या दिवशी एकमेव अर्ज दाखल झाल्याने आष्टीच्या नगराध्यक्षपदी जिया बेग यांच्या मातोश्री बेग मिर्झा आयशा इनायतुल्ला पाटोदाच्या नगराध्यक्षपदी राजू जाधव यांची पत्नी दिपाली जाधव बिनविरोध निवड होणार असून दि.२५ जुलै रोजी औपचारिक घोषणा होणार आहे.
आष्टी,पाटोदा नगरपंचायती आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्यानंतर आष्टी येथे पल्लवी धोंडे तर पाटोदा येथे सय्यद खतिजाबी अमर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.नगराध्यक्ष पदाचा कालावधी अडीच वर्षाचा असला तरी पक्षीय पातळीवर सुरुवातीलाच सव्वा वर्ष प्रत्येकाला संधी असे राजकीय समीकरण ठरले होते. त्यामुळे आता सव्वा वर्ष होताच पल्लवी धोंडे (आष्टी) आणि सय्यद खतिजाबी अमर (पाटोदा) यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.त्यानंतर दैनिक प्रजापत्रचा अंदाज खरा ठरला असून आज आ.सुरेश धस यांच्या आदेशाने आष्टीत मुस्लिम समाजाला तर पाटोदा येथे मराठा समाजाला न्याय देत जातीय सलोखा राखत जिया बेग व पाटोदाचे राजू जाधव यांना न्याय दिला आहे. आष्टीच्या नगराध्यक्षपदी जिया बेग यांच्या मातोश्री बेग मिर्झा आयशा इनायतुल्ला पाटोदाच्या नगराध्यक्षपदी राजू जाधव यांच्या पत्नी दिपाली जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड होणार असून दि.२५ जुलै रोजी औपचारिक घोषणा होणार आहे.