गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. पावसाळ्याचे दिवस आणि वातावरण बदलाचा फटका बसल्याने सगळ्याच भाजांचे भाव वाढले आहेत. या भाव वाढीचा फटका सामान्य लोकांच्या खिश्याला बसला आहे. त्यातच अनेक कलाकार मंडळींनी देखील टोमॅटोच्या भाव वाढीवर प्रतिक्रिया दिली होती.
बॉलिवूड सुपरस्टार सुनिल शेट्टी (sunil shetty) याने देखील टोमॅटोच्या भाव वाढीवर प्रतिक्रिया दिली होती. टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम आम्हा कलाकरांवरही होतो असं म्हणत टोमॅटोचे भाव वाढीमुळे त्याच्या स्वयंपाकघरात टोमॅटोचा वापर कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
आजकाल मी टोमॅटो कमीच खात आहे. अनेक लोकांना वाटत की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही. पण तसं नाही आम्हालाही भाववाढीचा फटका बसतो.
सुनील शेट्टीला त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी देखील ट्विट करत त्यांच्यावर टिका केली होती.
जोरदार ट्रोलिंग झाल्यामुळे अखेर सुनील शेट्टी या प्रकरणी आपले स्पष्टीकरण दिले आहे. ट्रोलिंगमुळे तो खुप दुखावला असल्याचं त्याने म्हटले आहे.
आपल्या वक्तव्यांवर बोलतांना सुनील शेट्टी म्हणाला की, 'मी आपल्या शेतकऱ्यांना नेहमी पाठिंबा देतो. त्यांच्याबद्दल काही वाईट बोलण्याची कल्पनाही मी करु शकत नाही.
आपण केवळ आपल्या स्वदेशी आणि मातीत पिकवलेल्या उत्पादनाचा प्रचार करायला हवा, त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांची मदत होइल.
शेतकरी हा माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मी हॉटेल व्यवसायात असल्याने त्यांच्याशी माझा संबध कायम असतो.
त्याच्या वक्तव्यांचा चुकिच्या पद्धतिने अर्थ काढला गेल्याचे त्यांने सांगितले. वक्तव्य चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचंही तो बोलला. त्याचबरोबर त्याने त्याच्या वक्तव्याबद्दल शेतकरी बांधवांची माफीही मागितली.
तो म्हणाला , 'माझ्या अशा काही वक्तव्यामुळे जे मी कधी केलेले नाही, अशा कोणत्याही विधानामुळे त्यांची मन दुखावली गेली असतील, तर मी त्यांची मनापासून माफी मागतो. त्याबद्दल असं बोलण्याचा विचार मी स्वप्नातही करु शकत नाही.'
सुनील शेट्टी म्हणाला की त्याच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून गैरसमज करुन घेऊ नका, या विषयावर त्याला आणखी काही बोलायचं नाही.