मुंबई - मागील काही दिवसांपासून बोगस बियाणे आणि खतांची विक्री राज्यातील अनेक भागांमध्ये झाल्याचं उघड झालं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खते व बियाणे वाटप केल्याप्रकरणी हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या संदर्भात मंत्री गिरीश महाजनांनी कॅबिनेटमध्ये मुद्दा उपस्थित केला.
हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती कायदा तयार करेल आणि दोषीं विरोधात कडक कारवाई करेल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी म्हटलं. या समितीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश असेल.
धनंजय मुंडे म्हणाले की, जळगावसह इतर जिल्ह्यातील प्रकरणे समोर आली आहेत. जे बियाणे देण्यात आले ते बनावट आहे. खतं देखील बनावट देण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मुंडे यांनी मान्य केलं.