Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - अस्वस्थ करणारा कौल

प्रजापत्र | Monday, 17/07/2023
बातमी शेअर करा

भाजपने इतर पक्षांमध्ये फूट घडवून राज्या-राज्यांमध्ये भलेही स्वत:ची सत्ता बळकट केली असेल.आजघडीला अनेक स्वायत्त म्हणविणाऱ्या संस्था देखील सत्तेच्या वळचणीला बांधल्या गेल्या असतील, मात्र त्यामुळे जनता कोणाच्या वळचणीला बांधता येत नसते. शिवसेनेमधील फुटीनंतर उध्दव ठाकरेंना वाढत असलेली सहानुभूती असेल किंवा आता राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर शरद पवार यांच्या बाजूने झुकत असलेला सहानुभूतीचा कौल,सत्तेच्या मस्तीत आम्ही काहीही करु शकतो या हवेत असलेल्या भाजपला हा कौल अस्वस्थ करणारा आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटाने बंड केल्यानंतरच्या राजकीय परिस्थितीचे जे सर्व्हेक्षण समोर येत आहे, त्यातून शरद पवार गटाला सहानुभूती वाढत असल्याचेच समोर आले आहे.यापूर्वी देखील एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उध्दव ठाकरेंना सहानुभूती वाढली होती.
सत्तेच्या जोरावर, ईडी,सीबीआयसारख्या यंत्रणा वापरुन,पैसा,दहशत आणि वेगवेगळी आमिषे दाखवून पक्ष फोडता येतात,विद्यमान लोकप्रतिनिधींना फोडता येऊ शकते, पण सामान्य जनतेला हे कधी रुचत नाही.आज देशाच्या आणि त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरु आहे, ते शब्दश: शिसारी आणणारे आहे. सामान्यांना राजकारणाची किळस यावी असे चित्र भाजपने महाराष्ट्राला दाखविले आहे. सत्ताकारणाला कधी विकासाचे तर कधी आणखी कोणतेही तात्विक मुलामे देण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी असले मुलामे टिकत नसतात. एक ना,एक दिवस असले मुलामे गळून पडतात आणि मग समोर आलेला चेहरा हा ओंगळवाणा असतो.आज अशाच चेहऱ्याची राजकारणात बजबजपूरी माजली आहे.
मात्र इतिहासात डोकावले तर असली फोडाफोडीची विकृती सामान्यांना कधी फारशी रुचत नाही. ज्यावेळी निव्वळ सत्तेसाठी असले प्रयोग केले गेले त्यानंतरच्या निवडणुकीत आयाराम गयारामांना जनतेने साथ दिलेली नाही हेच राजकीय वास्तव आहे. पक्ष, निष्ठा हे शब्द जरी राजकीय शब्दकोशामधून केंव्हाच हद्दपार झाले असले तरी जनतेला मात्र इतका उथळपणा रुचत नाही हे लक्षात ठेवावे लागेल. अगदी एकनाथ शिंदेंना भलेही भाजपने मुख्यमंत्री केले असेल मात्र, त्यानंतर काही दिवसातच हा चेहरा राज्यात चालणार नाही याची जाणीव भाजपला झाली आहे, आणि म्हणूनच आता अजित पवारांचा प्रयोग केला जात आहे. मात्र आजच्या तारखेत शरद पवारांना आणि महाविकास आघाडीला जो सहानुभूतीचा टक्का वाढत आहे, तो भाजपला अस्वस्थ करणारा नक्कीच आहे.

Advertisement

Advertisement