◼️साहिल पटेल
राजकारणात संयम नेहमीच महत्वाचा असतो. संयम आणि संघर्षातून जे नेतृत्व पुढे येतं ते नेतृत्व मग बॅ्रंड बनतं. धनंजय मुंडे हे अशाच नेतृत्वापैकी एक. आज राज्याच्या कोणत्याही भागात धनंजय मुंडे यांच्या नावावर गर्दी हमखास जमते. मागच्या काही काळात ज्यांची भाषणं गर्दीने ऐकावी असे नेते मोजके राहिलेले आहेत. धनंजय मुंडे हे त्यापैकी एक आहेत. जनतेची नाळ कळालेली असल्याने ते खर्या अर्थाने ते लोकनेता बनत आहेत.
राज्यमंत्री मंडळात समावेश झाल्यानंतर धनंजय मुंडे गुरूवारी बीड जिल्ह्यात आले. मागच्या काही काळात बीड जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्याचा नेता असं काही चित्रच राहिलं नव्हतं. असे असताना गुरूवारी बीड जिल्ह्यात प्रवेश करताना धानोरा(ता.आष्टी) ते परळी इथपर्यंत गावागावात धनंजय मुंडेंचे जे स्वागत झाले ते स्वागत अभूतपूर्व होते. जिल्ह्याच्या कानाकोपर्यात कार्यकर्ता समोर येतो आणि धनंजय मुंडेंचे स्वागत करतो. ही गोष्टच धनंजय मुंडेंचा प्रवास लोकनेते पदाकडे कसा झाला आहे हे दाखविणारी आहे. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातही जे काही नेते आहेत त्यांच्यातील अनेकांच्या बाबतीत वयाने कदाचित धनंजय मुंडे ज्युनियर असतीलही. पण आज आपल्या राजकीय कर्तृत्वाने तेच धनंजय मुंडे राज्यातील काही प्रमुख नेत्यांमध्ये गणले जातात. दिवंगत गोपीनाथ मुंडे याच्या बोटाला धरून धनंजय मुंडेंचे राजकारण सुरू झाले आणि ज्या राजकीय कौशल्यावर दिवंगत गोपीनाथ मुंडे मोठे झाले होते तीच राजकीय कौशल्ये धनंजय मुंडे यांनी आत्मसात केली. गर्दी ही गोपीनाथ मुंडेंची ऊर्जा होती. हे जर कोणी चपखलपणे हेरले असेल तर ते धनंजय मुंडेंनी. म्हणूनच तीच गर्दी आता धनंजय मुंडेंचा प्राण झाली आहे. समोर जमलेली गर्दी धनंजय मुंडेंना वेगळा उत्साह देते आणि अनेक अडचणींवर मात करण्याची शक्ती देखील.
राज्याच्या कोणत्याही भागात धनंजय मुंडे गेले तर त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी गर्दी जमतेच. राजकीय कोट्या करत विरोधकांवर शाब्दिक हल्ले चढवावेत ते धनंजय मुंडेंनीच. ते ज्या पदावर असतील त्या पदाला साजेसे वक्तृत्व त्यांच्याकडे आहे म्हणूनच विरोधीपक्ष नेता असताना आक्रमक असणारे धनंजय मुंडे राज्यात मंत्री असताना तितक्याच पालकत्वाच्या भावनेतून बोलताना राज्याने अनुभवले. मधल्या काळात धनंजय मुंडेंकडे आमदारकी सोडली तर कोणतेच पद नव्हते त्याही वेळी सरकारच्या धोरणांवर विरोधक म्हणून टीका करतानाचे धनंजय मुंडे आणि आता राज्याच्या सत्तेत पुन्हा आल्यानंतर एक जबाबदार मंत्री म्हणून वागणारे धनंजय मुंडे ही त्यांची वेगवेगळी रूपं.
कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा असतानाही अडचणीच्या काळात उभे राहणार्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवणं, त्यांचा आवर्जून उल्लेख करणं, गर्दीतूनही एखाद्या कार्यकर्त्याला पाहून त्याला जवळ बोलवत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणं, हजारोंच्या गर्दीतून एखादा चेहरा हमखासपणे शोधून काढणं हे सारं करण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत तितकीच तगडी नाळ जुळावी लागते ती धनंजय मुंंडेंना जुळविता आली म्हणूनच धनंजय मुंडे खर्या अर्थाने लोकनेते ठरले आहेत.