Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - शिंदे गटाची गोची

प्रजापत्र | Saturday, 15/07/2023
बातमी शेअर करा

राज्याच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचा नवा भिडू म्हणून समावेश केल्यानंतर रखडलेले खातेवाटप अखेर जाहीर झाले. ज्या अजित पवारांना कडाकडून विरोध करत शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला होता, आणि अजित पवार निधी देत नाहीत अशी ओरड ज्या शिंदे गटाची होती त्याच एकनाथ शिंदेंना आपल्या मंत्रीमंडळात अर्थ खाते अजित पवारांकडे सोपविण्याची वेळ आली. शिंदेंनी तब्बल बारा दिवस खातेवाटप रखडवण्यात यश मिळविले.तरी शेवटी अजित पवारांचाच प्रभाव वरचढ ठरल्याचे आता स्पष्ट आहे. यामुळे शिंदे गटाची मात्र गोची होणार आहे.

राज्याच्या राजकारणात अजित पवार गटाला भाजपाने आपल्यासोबत घेतले. त्याचवेळी शिंदे गटाची उपयुक्तता भाजपासाठी कमी झाल्याचे स्पष्ट होते.राज्यातील सरकारला तशी गरज नसताना ज्या अर्थी अजित पवारांना सोबत घेतले गेले आणि बहुप्रतिक्षित मंत्रीमंडळ विस्ताराचे बाशिंग बांधलेल्या भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांना बाजूला सारून केवळ राष्ट्रवादीच्या नऊ लोकांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली त्याचवेळी आता सरकारमध्ये अजित पवारांची चलती असेल हे स्पष्ट झाले होते. राज्याच्या राजकारणात आणि सत्तेत राष्ट्रवादीची अवस्था आता कानामागून येऊन तिखट झालेल्या व्यक्तीसारखी असेल.
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारमधून बाहेर पडताना अजित पवारांवर खापर फोडले होते.त्यामुळेच एकतर अजित पवारांनाच सरकारसोबत घेण्यास शिंदे गटाचा विरोध होता.पण शिंदे गटाला भाजपाने विचारलेच नाही. त्यानंतर आम्ही आमच्याकडील खाती देणार नाही असा आडमुठेपणा काहीकाळ जरी शिंदे गटाने करून पाहिला असला तरी दिल्लीवरून आदेश येताच एकनाथ शिंदेंचाही नाईलाज झाला असावा असे चित्र आहे. अजित पवार आता शिंदेंच्या मंत्रिमंडळातही अर्थ व नियोजन खाते सांभाळणार आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या काळात अस्थिर झालेले शिंदे गटाच्या निधीचे नियोजन अधिकच फिस्कटेल हे स्पष्ट आहे. ज्या शिंदे गटाला आपल्याकडील खाती सोडायचीच नव्हती त्यांना कृषि आणि अन्न व औषध प्रशासन ही दोन्ही खाती सोडावी लागली आहेत. या ठिकाणीही एकनाथ शिंदेंना चार पाऊले मागे यावे लागले. अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषि खाते होते.त्यांच्या काळात कृषि खात्यात जे काही घडले त्याच्या चर्चा जळगावपासून गल्लीपर्यंत ठिकठिकाणी झाल्या.अगदी तुमच्या खात्यामुळे सरकारची शोभा होत आहे अशा कानपिचक्या सत्तारांना देण्याची वेळ खुद्द मुख्यमंत्र्यांवर आली. संजय राठोड यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. अन्न व औषध प्रशासनाचे मंत्रीपद त्यांच्याकडे होते. या काळात या खात्यातील अधिकार्‍यांना कोण कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले याचेही रंजक किस्से आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांबद्दल नाराजी होतीच. आता या दोघांचीही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. त्यासोबतच वैद्यकीय शिक्षण,सहकार,अन्न व नागरी पुरवठा अशी मोठी खाती मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. या सगळ्यामध्ये गोची झाली आहे ती एकनाथ शिंदेंची. आता मंत्रीमंडळाचा पुढचा विस्तार केंव्हा होईल आणि त्यातून आपल्या गटाला कोणती खाती टिकवून ठेवता येतील यासाठीची देखील मोठी कसरत शिंदेंना करावी लागेल अन्यथा त्यांच्या गोटातील अस्वस्थता वाढत जाणार आहे.

Advertisement

Advertisement