मुंबई - उत्पादन खर्च व दुधाला मिळालेला भाव यात ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. हिरवा व कोरडा चारा तसेच पशु खाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. खर्चाच्या तुलनेने दुधाला किमान 35 ते 40 रुपये भाव मिळावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत होती.
दूधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दूधाला प्रतिलिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा महत्त्वाचा निर्णय दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे.
राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली होती.
सहकारी आणि खाजगी दूध संघांचा खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चित करण्यासाठी शासन समिती गठीत केली होती.
दूधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर 3 महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्यात यावी.
किमान दूध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्या मार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
दुधाचे दर वाढवून देण्याची मागणी का?
कृषी विद्यापीठांनुसार गायीच्या दुधाचा उत्पादनखर्च प्रति लिटर 28 रुपये असताना आणि लॉकडाऊनपूर्वी दुधाला 32 रुपये दर मिळत असताना मोठा तोटा सहन करून शेतकऱ्यांना दूध विकावे लागले.
लॉकडाऊन काळात 18 ते 20 रुपये प्रति लिटर इतक्या नीचांकी दराने खरेदी केलेल्या दुधातून विविध कंपन्यांनी व दूध संघांनी दूध पावडर बनवली. त्याचे मोठे साठे करून ठेवले.
आज दूध पावडरचे दर 300 रुपयाच्या पलीकडे गेले असताना स्वस्तात दुध घेऊन तयार केलेल्या दूध पावडरच्या विक्रीतून या कंपन्या व दूध संघ अमाप नफा कमवत असून शेतकऱ्यांना मात्र या नफ्यामध्ये सहभागी करून घेण्याची त्यांची तयारी दिसत नसल्याचा दावा डॉ. अजित नवले यांनी केला होता.