समीर लव्हारे
बीड दि.१२- ही घटना असेल ४-५ महिन्यांपूर्वीची, अपघातातून बरे होऊन आल्यानंतर धनंजय मुंडे यांचे परळीत स्वागत झाले होते,तो काळ तसा धनंजय मुंडे यांच्यासाठी अडचणींचा होता. त्या सभेत धनंजय मुंडे यांनी एक शेर वापरला होता, त्यात ते म्हणाले होते 'वक्त ने जरासा साथ क्या न दिया, लोग मेरे काबिलीयत पे शक करणे लगे'.आज ४-५ महिन्यानंतर तिच परळी धनंजय मुंडेंच्या...नव्हे मंत्री धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी सजली आहे. परळीचे नाव देशाच्या राजकारणात घेतले जायचे ते दिवंगत गोपीनाथ मुंडेंमुळे.आता मात्र परळीला राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका मिळवून दिलीय ती धनंजय मुंडेंनी.राज्यातील मोजक्या प्रमुख नेत्यांपैकी एक होऊन धनंजय मुंडेंनी आपली 'काबिलीयत' सिद्ध केली आहे.
गोपीनाथ मुंडे हयात असताना बीड जिल्ह्याची राजकीय ओळख आणि जिल्ह्याचा राजकीय चेहरा होता गोपीनाथ मुंडे.गोपीनाथ मुंडे अकाली गेले आणि देशाच्या, राज्याच्या राजकारणात बीड जिल्ह्याच्या संदर्भाने एक पोकळी निर्माण झाली. मधल्या काळात अनेकांनी ती भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बीड जिल्हा म्हटले की, राज्याच्या राजकारणात कोणते तरी एक नाव घ्यावे अशी परिस्थिती राहिलेली नव्हती.धनंजय मुंडे यांनी मागच्या काही काळात तशी परिस्थिती निर्माण करण्यात यश मिळवले आहे. आज केवळ अजित पवारांच्या बंडामध्ये मध्यवर्ती भूमिका होती म्हणूनच नव्हे, तर एकंदरीतच बेरजेच्या राजकारणाच्या भूमिकेमुळे असेल, राज्यातील काही मोजक्या प्रमुख नेत्यांपैकी एक नाव म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहावे लागते.
राजकारणाच्या प्रत्येक वळणावर धनंजय मुंडे हे स्वतःला संघर्षातून सिद्ध करीत आले.कधी घरातला, कधी पक्षातला ,कधी विरोधकांचा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, आणि त्या प्रत्येक संघर्षातून धनंजय मुंडेंच्याच शब्दात सांगायचे तर 'मै जब जब भी बिखरा हू, दुगणी रफ्तार से निखरा हू' याधर्तीवर धनंजय मुंडे सिद्ध होत गेले. विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेता सुद्धा चर्चेत येऊ शकतो हे त्यांनीच दाखविले. मविआच्या काळातील मंत्रिपदाची कारकीर्द असेल, किंवा राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून राज्याला परिचित झालेला त्यांचा चेहरा असेल, प्रत्येक अडचणींवर मात करीत धनंजय मुंडे हे नाव आज राजकारणात ब्रँड झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिका काय आहेत, यावर चर्चा आणि वेगवेगळे मतप्रवाह असतीलही,पण धनंजय मुंडे कशाला, स्वतः गोपीनाथ मुंडे देखील 'राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो,' असे म्हणायचेच ना. आज तेच बेरजेचे राजकारण करून धनंजय मुंडे राज्यातला बीडचा चेहरा होत आहेत, आणि म्हणूनच त्यांच्या स्वागतासाठी आज केवळ परळी नाही, तर सारा बीड जिल्हा सजला आहे. मागच्या काही काळात जिल्ह्याचे राजकारण एकछत्री नव्हते, प्रत्येक मतदारसंघात विभागलेले होते. पालकमंत्री असले तरी त्यांनी इतरांच्या मतदारसंघात लक्ष द्यायचे नाही असा अलिखित दंडक होता , आता धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र या सीमारेषा पुसल्या गेल्या आहेत. सारा जिल्हा त्यांच्या स्वागतला उभा राहतो यातच त्यांनी आपली 'काबिलीयत ' सिद्ध केली आहे.