नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दरांनी रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठला आहे. यानंतर आता केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मोदी सरकारने शेतमाल खरेदी संस्था अर्थात नाफेड आणि सहकारी संघांना आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर स्वस्त दराने टोमॅटो वितरीत करण्यात येणार आहे. मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो २०० रुपये किलो पर्यंत दराने विक्री केली जात आहे.
राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ अर्थात नाफेड आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ टोमॅटोची खऱेदी कऱणार आहेत. केंद्रीय मंत्रालयानुसार जिथे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहेत, तिथे स्वस्त किंमतीत विक्री केले जातील.
मंत्रालायानुसार, आगामी काळात लवकरच टोमॅटोचे दर कमी होतील. वास्तविक ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत टोमॅटोचे उत्पादन कमी होते. शिवाय जुलै महिन्यात मॉन्सूनमुळे भाजीपाल्याची वाहतूक करण्यात अडचणी येतात. त्यामुळे देखील दरवाढ होते. भारतात टोमॅटोचे उत्पादन कमी अधिक प्रमाणात सर्वच भागांमध्ये होते. मात्र दक्षिण आणि पश्चिमेकडे टोमॅटोचे अधिक उत्पादन घेण्यात येत.