पाटोदा नगरपंचायत निवडणूक
बीड-पुढील वर्षात होऊ घातलेल्या पाटोदा नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यात लक्ष घातले आहे. मात्र राष्ट्रवादीने ठरवलेल्या काही उमेदवारांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच रणांगण सोडल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीतीलच एका पुढाऱ्याने यासंदर्भात बैठकीतील रणनीती विरोधी पक्षाला सांगितली आणि त्यामुळेच राष्ट्रवादीला आता नव्याने उमेदवार शोधण्याची वेळ आली असल्याचे सांगितले जात आहे. स्वकियच पक्षाला 'राख' लावण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादी नगरपंचायत निवडणुकीला सामोरी कशी जाणार हा प्रश्नच आहे.
पुढील वर्षाच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणूक अपेक्षित आहेत. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या देखील निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये आष्टी मतदारसंघात भाजपला धक्का देण्यासाठी स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे सक्रिय झाले आहेत.
त्यांच्याच सूचनेवरून पाटोदा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीने तयारी सुरु केली होती. त्यानुसार आ.बाळासाहेब आजबे,रामकृष्ण बांगर,आप्पासाहेब राख आदी नेत्यांच्या बैठक देखील झाल्या. त्या बैठकांमध्ये निवडणुकीची रणनीती ठरली आणि अनेक वॉर्डातील उमेदवारांची नावे देखील निश्चित करण्यात आली. मात्र या बैठकीची आणि संभाव्य नावांची माहितीच राष्ट्रवादीच्या काहींनी भाजपच्या नेत्यांना कळविल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही संभाव्य चेहऱ्यांना भाजपने आपलेसे केले आहे, तर काहींनी थेट निवडणूक लढवायलाच नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक अवघ्या २-३ महिन्यावर आणलेली असताना आता राष्ट्रवादीला नव्याने उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
पक्षातीलच कोणीतरी पक्षाला राख लावण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीची मात्र गोची होत असल्याची चर्चा आहे. आता राष्ट्रवादीचे नेतृत्व यातून कसा मार्ग काढते आणि स्वपक्षातील विरोधकांवर कसा 'विजय' मिळवते याकडे सर्वांचे लक्ष असेल.