अजित पवार बंड केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण आता शपथविधी सोहळ्याला आठवडा उलटून गेला असला तरी खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खातेवाटपावरुन वाद सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. यादरम्यानच, राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांकडे अर्थ खातं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सध्या अर्थ खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांचं खातं आता अजित पवारांकडे जाईल.
कोणाला कोणतं खातं?
मात्र गृह आणि सहकार खातं मात्र भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राज्य सरकारच्या खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती मिळतेय.. मात्र निधीवाटपावरुन शिंदे गटाने तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांविरोधात नाराजी बोलून दाखवली होती. तेव्हा शिंदे गटाला हा निर्णय मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान राज्यात सध्या राष्ट्रवादीचे नव्याने आलेले मंत्री हे बिनखात्याचे आणि बिनकामाचे आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली. सरकारमध्ये कमालीचा असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला. याला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. खातेवाटपाबाबत काळजीचं कारण नाही, मविआचं महिन्यानंतर खातेवाटप झालं होतं, आता लवकरच खातेवाटप होईल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.