अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच, शिवसेना हे पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचे काम निवडणूक आयोगाचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
सध्या सगळेजण पाहत आहेत, राजकारणात पक्ष फोडणे ही गोष्ट नवी नव्हती. पण, आता लोक पक्ष चोरत आहेत. पण, शिवसेना हे पक्षाचे नाव माझ्यासोबत राहील. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले होते. ते नाव मी कोणाला घेऊ देणार नाही. नाव देणं हा निवडणूक आयोगाचा आधिकारच नाही. निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकते, तो त्यांचा अधिकार आहे. पक्षाचे नाव माझंच आहे आणि ते माझ्याकडेच राहील. निवडणुकांदरम्यान नियमांचे पालन होत आहे की नाही, ते पाहणे त्यांचे काम आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
याचबरोबर, सध्या जाहीर सभेचा काळ नाही. त्यामुळे मी सभेसाठी फिरत नाही. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरत आहे. सर्व कार्यकर्त्यांना मातोश्रीवर भेटणे शक्य नाही. या आव्हानात्मक काळात कट्टर शिवसेना कार्यकर्त्यांना भेटत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. सध्या मी मुख्यमंत्री नाहीये, त्यामुळे त्यावर भाष्य करू शकत नाही. पण काल सामना पिक्चरमधील गाणं आठवलं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.