माजलगाव - माजलगाव शहर येथे मोटर सायकल चोरी झाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर काल रात्री सदर गुन्ह्याच्या आरोपीना ताब्यात घेण्यात माजलगाव पोलिसांना यश आले आहे.सचिन स्वामी (वय-32),माजलगाव व संजय चाळक (वय-25),माजलगाव असे आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीच्या एकूण 12 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. माजलगाव, गेवराई आणि गंगाखेड येथून या गाड्या चोरी गेल्या होत्या.ज्या मोटरसायकल चे स्विच जूने झाले आहेत,ज्या व्यवस्थित लॉक केल्या नाहीत त्याच गाड्या पाळत ठेऊन चोरटे चोरत असल्याचे चोरट्यांकडून समजले. चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी अशा टोळ्यांची माहिती काढून त्यांचे विरुध्द प्रस्थापित कायद्यान्वये कारवाई करावी अशा सूचना यापूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या होत्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर- पवार , सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शन प्रमाणे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरिक्षक गजानन सोनटक्के,पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, पोलिस जमादार गणेश तळेकर,पोलिस अमलदर महेश चव्हाण ,पोलीस अमलदार साहदू कोकाटे यांनी केली आहे.
माजलगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की लोकांनी आपले वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावी, शक्य तोवर समोरच्या व्हीलचे लॉक लावावे. आजूबाजूला आपल्या गाडीवर कोणी पाळक असेल अशावेळी गाडी सुरक्षित ठिकाणी पार्क करावी.