Advertisement

भुजबळ सोडून गेल्याचं दुःख वाटतं का?

प्रजापत्र | Saturday, 08/07/2023
बातमी शेअर करा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली.यानंतर शरद पवार हे जोमाने पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. पक्षातील बंडानंतर त्यांची आज पहिल्यांदाच छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेपूर्वी शरद पवरांनी नाशिक येथे पत्रकारपरिषद घेतली.

 

अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान दोन वर्ष तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं, त्यांच्या वाईट काळात त्यांच्यावर विश्वास दाखवला. ते भुजबळ तुम्हाला सोडून गेले याचं वाईट वाटतं का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.

पवार म्हणाले की, यातून माणसाचं कॅरेक्टर कळतं. माझ्या स्वतःबद्दल वाटतं इतराबद्दलं नाही, तेही एकाच गोष्टीचं वाटतं की, माझा अंदाज योग्य ठरला नाही, हा माझा दोष आहे मी दुसऱ्याला दोष देणार नाही, असे शरद पवार म्हणाले. २०२४ मध्ये भुजबळांना लोक स्वीकारतील का? असे विचारले असता पवार म्हणाले की, जे आमच्या पासून दूर गेले त्यांच्याबद्दल भाष्यच करायला नको, लोक ठरवतील मी कोण ठरवणार.

या दरम्यान एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या मुंबईतील सभेत शरद पवारांवर जाहीर टीका केली होती. भुजबळ म्हणाले होते की, शरद पवार आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरलं आहे. पवारांनी बडव्यांना बाजूला करून आम्हाला आशिर्वाद द्यावा. तसेच या सभेत भुजबळांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पवारांनी पाडलं त्याचा उल्लेख देखील केला होता.

Advertisement

Advertisement