बीड-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन्ही गट आपली शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.यातच बीड जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पाठीशी उभारी राहिल्याचे चित्र आहे. हे चित्र निर्माण करण्यात राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांची मेहनत मोठी राहिलेली आहे. सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यापासून ते आता अजित पवार गटात नेण्यापर्यंत या जोडीने मेहनत घेतली आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बीड जिल्हा कोणाच्या बाजूने उभा राहणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्याचे उत्तर आता स्पष्ट झाले आहे.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याने अजित पवार यांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. काही अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत गेली,यात इतर अनेकांप्रमाणेच वाल्मिक कराड आणि युवकचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांचे मोठे योगदान राहिले आहे. वाल्मिक कराड हे मागच्या काही वर्षात पडद्याआडून संघटन वाढविण्यात यशस्वी झालेले आहेत. अनेक तरुण,उद्योजक आणि जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचे जाळे त्यांनी निर्माण केले होते.धनंजय मुंडे यांच्यासाठी निर्माण केलेले हे संघटन आता मुंडेंच्या माध्यमातून अजित पवारांचे हात बळकट करीत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या युवक विभागाचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यापासून विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी जिल्ह्यात युवकांचे संघटन अधिक प्रभावी करण्यावर भर दिला. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध निर्माण केले. त्यातूनच आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेचे ११ पैकी १० तालुकाध्यक्ष विजयसिंह बांगर यांच्यासोबत म्हणजेच धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या गटात गेले आहेत.केवळ एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि जेष्ठ कार्यकर्त्यांची मोट बांधत त्यांनाही अजित पवारांच्या गटात दाखल करण्याची किमया वाल्मिक कराड आणि विजयसिंह बाळा बांगर यांनी साधली आहे.दरम्यान जिल्ह्यातील नेतृत्वाला साथ देण्यासाठीची कराड आणि बांगर जोडीची मेहनत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.