Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - ज्यांनी कार्यकर्ता व्हावे...

प्रजापत्र | Friday, 07/07/2023
बातमी शेअर करा

नेता होणं सोपं आहे, पण कार्यकर्ता होणं अवघड झाल्याचा हा कालखंड आहे. नेत्यांचं काय, त्यांना क्षणात आपल्या राजकीय भूमिका बदलता येतात, कपडे बदलावेत त्याप्रमाणे ते राजकीय रुमाल बदलू शकतात, बदलतात. मात्र सामान्य कार्यकर्त्यांमध्ये एकतर हा राजकीय कोडगेपणा नसतो आणि कार्यकर्त्यांचे अनेक घोंगडे अनेक ठिकाणी अडकलेले असतात, वैर घेतलेले असते ते कार्यकर्त्यांनी. त्यामुळेच मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नात्यांमध्ये सामान्य कार्यकर्ता मात्र प्रचंड अस्वस्थ आहे.

 

 

     मागच्या काही दिवसात राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे सर्वाधिक अस्वस्थ कोण असेल तर तो म्हणजे कोणत्याही पक्षाचा तिसऱ्या, चौथ्या फळीतील सामान्य कार्यकर्ता . पहिल्या फळीतले नेते किमान दुसऱ्या फळीतल्या आपल्या समर्थकांना काही विचारतात तरी, मात्र तिसऱ्या, चौथ्या फळीतल्या ज्या कार्यकर्त्यांनी कायम केवळ झेंडे वागवायचे आणि नेत्यांची जय म्हणायचे काम केले, ज्यांची हयात यातच गेली, त्यांचा राजकीय बदलाच्या नौटंकीत कोणीच विचार करीत नाही. त्यामुळे नेत्याने निर्णय घेतला की त्यामागे फरफटत जायचे असेच स्वरूप सध्या लोकशाही व्यवस्थेला आले आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्या मनाची होणारी अवस्था नेत्यांच्या गावीही नाही आणि असलीच तर त्यांची चिंता नेते करीत नाहीत अशीच परिस्थिती आहे.

     मागच्या आठवडाभरापासून म्हणा किंवा मागच्या काही वर्षांपासून, राज्यात काय किंवा देशात काय, जे काही घडत आहे, घडविले जाते आहे, ते सारे सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वासघात करणारे आहे. गाव पातळीवर किंवा शहरात, सामान्य कार्यकर्ता हा नेत्यांसाठी भांडणे अंगावर घेतो, नेत्यासाठी स्वतःवर गुन्हे दाखल झाले तरी फिकीर करीत नाही, त्या भांडणांमध्ये अनेकांना स्वतःचे घरदार विकावे लागल्याची उदाहरणे देखील कमी नाहीत. काही कार्यकर्त्यांचे कट्टरत्व इतके असते, की नेत्यांसाठी ते प्रसंगी नातेगोते देखील विसरतात. त्या कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षे जपलेली राजकीय संस्कृती किंवा विचार असा एका क्षणात बाजूला टाकता येत नाही. नेत्यांचे एक बरे असते, त्यांच्यात राजकीय कोडगेपणा इतका असतो, की अर्ध्यातासापूर्वी घेतलेली भूमिका देखील ते सहज बदलतात आणि त्याचे त्यांना कांहीच वाटत नाही. नेता स्वतःच्या सोयीने क्षणार्धांत आपला राजकीय झेंडा बदलतो. सकाळी एकाच्या बैठकीला जाऊन संध्याकाळी दुसऱ्याच्या बैठकीला हजेरी लावताना नेते जराही अस्वस्थ होत नाहीत, मात्र कार्यकर्त्यांचे काय? आज महाराष्ट्रभरात कार्यकर्त्यांना हाच प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रात मविआचे सरकार जाऊन ज्यावेळी शिंदे फडणवीसांचे सरकार आले, त्यावेळी ज्यांना 'खोके, बोके' म्हटले, त्यामुळे प्रसंगी स्थानिक नेत्यांचा विरोध स्वीकारावा लागला, गुन्हे दाखल झाले आज आपले नेते त्यांच्याच पंक्तीला बसल्यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी ज्यांना विरोध केला होता त्यांना काय तोंड दाखवायचे ? किंवा ज्यांनी नेते म्हणतात म्हणून अजित पवारांवर जाहीर भाषणांमधून टीका केली, त्यांना शिव्या घातल्या, त्यांनी आता कोणत्या तोंडाने सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायचे. फार लांबचे राहू द्या, गाव पातळीवर पक्षाची भूमिका म्हणून ज्यांना विरोध केला होता, आता पुन्हा त्यांच्याच दारात कार्यकर्त्यांनी जायचे का? आणि कोणत्या तोंडाने? असे अनेक प्रश्न कमी अधिक फरकाने सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडलेले आहेत. नेत्यांचे काय, त्यांनी काहीही केले तरी काहीच बिघडत नाही. त्यांच्याकडे आत्मसन्मान, विचारांची होणारी गोची, विकासनिधी, विकासाची भूक, जोडीला विठ्ठल-बडवे असले खूप काही असते, पण कार्यकर्त्यांचे, त्यांच्यावर राजकारणातून दाखल झालेल्या गुन्ह्यांचे, त्यांच्या नेत्यांची टाळी उचलताना उद्ध्वस्त झालेल्या संसाराचे काय? कार्यकर्त्याची ही अस्वस्थता कोणी समजून घेणार आहे का? असे प्रश्न आहेत, आणि त्याचे उत्तर अर्थातच नकारात्मकच आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनीच शहाणे होण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही नेत्यासाठी वैयक्तिक विरोध, दुश्मनी किती घ्यायची आणि स्वतःचे घर किती जाळायचे याचा विचार कार्यकर्ता होणारांनी करणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement