धनंजय मुंडे यांनी वृत्त फेटाळलं
मुंबई : राज्यावर एकीकडे करोना संकट असल्याने आर्थिक समस्यांचा डोंगर उभा असताना मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं काही मंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांच्या एकूण ३१ बंगल्यांच्या डागडुजीसाठी निविदा काढल्या त्या सादर होण्याआधीच कामाला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं शासकीय निवासस्थान वर्षासह इतर अनेक बंगल्यांचा समावेश आहे. सामाजित न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही यात उल्लेख आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत फेटाळलं आहे. तीन कोटी सोडा मी एक रुपयाही खर्च केलेला नाही असं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.ते म्हणाले आहेत की, “काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे.त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. “मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी खर्च झालेले नाहीत. मी माहिती घेतली, काहीही बातम्या दिल्या जातात. अजून आकडेच पुढे आलेले नाहीत तर ९० चा आकडा कुठून काढला?,” असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.
हेही वाचा