बीड - देशात हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या देशात लोकशाही टिकावी आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचे सरकार यावे यासाठी सर्वात पुढे राष्ट्रवादीचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब आले. त्यामुळेच राष्ट्रवादी फोडण्याचा कुटील डाव भाजपाने रचला. परंतु सामान्य जनता पुन्हा एकदा पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. साहेब पुन्हा एकदा तरुणाईला सोबत घेऊन नव्याने पक्ष बांधणी करतील. पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील आणि पक्ष विजयाच्या दिशेने आज पासून घोडदौड सुरू करेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या माजी आमदार तथा माजी महिला प्रदेशाध्यक्ष उषा दराडे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात आज जे काही राजकीय नाट्य घडले ते सामान्य जनतेच्या डोळ्यात संताप जनक रक्त उतरवणारे होते. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी कायम पुरोगामी विचारांना प्राधान्य दिले. महिलांच्या प्रगतीसाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. मंडळ आयोगाच्या शिफारशींसाठी सर्वात प्रथम पुढाकार घेतला. महिलांना 33% आरक्षण देण्यात यावे ही भूमिका धोरणात बदलली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50 टक्के संधी दिले. महिलांना कोर्ट फी माफीचा निर्णय घेतला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र महिला आयोगाची स्थापना केली. स्वतंत्र महिला धोरण 1994 मध्ये जाहीर केले. या निर्णयामुळे आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला सन्मानाने विविध पदांवर यशस्वीपणे काम करताना दिसत आहेत. महिलांना चूल आणि मुल यापेक्षा पुढे नेण्यामध्ये पवार साहेबांनी क्रांतिकारी निर्णय घेतले. एवढेच नव्हे तर साहेब जेव्हा केंद्रीय सुरक्षा मंत्री होते तेव्हा महिलांना वैमानिक करण्याचा धाडसी निर्णय अमलात आणला. वारसा हक्कामध्ये दुरुस्ती करून वडिलांच्या सत्तेमध्ये मुलांच्या हक्का एवढाच हक्क मुलींना देखील दिला. या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचे सरकार यावे म्हणूनच साडेतीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची मोट साहेबांनी बांधली. केंद्रात जे मोदी सरकार आहे ते देशामध्ये हुकूमशाही आणण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाच्या विरोधात आणि देशात लोकशाही टिकावी यासाठी मोदी शहांच्या विरोधामध्ये पवार साहेबांनी सर्वात आधी पुढाकार घेतला. संपूर्ण देशामध्ये मोदी शहा आणि भाजपाच्या विरोधामध्ये महाआघाडी स्थापन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या भूमिकेला देशभरातून प्रतिसाद मिळू लागल्याने मोदी शहांच्या कुटील राजकीय डावपेचातून राष्ट्रवादीचे काही आमदार फोडून त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. असे गलिच्छ राजकारण सामान्य जनतेला पटलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि पक्षाचे चिन्ह शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कायम राहील. साहेब पुन्हा एकदा पक्षाची बांधणी नव्या जोमाने करतील. साहेबांना साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणाई पुढे येईल.येणाऱ्या काळात शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी सर्व निवडणुकांमध्ये निवडून येतील आणि विजयाची घोडदौड याहीपेक्षा अधिक गतीने वाढेल, असा विश्वास व्यक्त करून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत पाठीशी कायम राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष उषा दराडे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे.