Advertisement

'आम्ही त्यांची विचारधारा स्वीकारली नाही''

प्रजापत्र | Wednesday, 05/07/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सर्वच वरिष्ठ नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं तोंडभरुन कौतुक केलं. परंतु रुपाली पाटील चाकणकर यांनी आज केलेलं विधान खळबळजनक आहे. 'आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर युती केलीय' असं स्पष्टीकरण चाकणकरांनी दिलं.

अजित पवार गटाने सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर तटकरे यांनी पक्षसंघटनेत मोठे बदल केले. रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आघाडीचं प्रदेशाध्यक्षपद दिलं आहे. त्या सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षही आहेत. आज बैठकीसाठी रुपाली चाकणकर पोहोचल्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चाकणकर म्हणाल्या की, हिंदुत्व मानणारी शिवसेना देखील यापूर्वी आमच्यासोबत होती. आता आम्ही जी युती केली आहे ती राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे. आम्ही त्यांची विचारधारा घेतलेली नाही. आमची भूमिका जी आधी होती तीच असेल, असं स्पष्टीकरण चाकणकरांनी दिलं.

एकीकडे अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदींचं आणि त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत असतांना रुपाली चाकणकरांनी मात्र विचारधारा स्वीकारली नसल्याचं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी आणि चित्रा वाघ तुम्हाला एकत्र दिसलो का? असं म्हणून त्यांनी तो विषय टाळला.

 

 

अजित पवार मुख्यमंत्री होणार?

दरम्यान, रेडिफने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार यांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर, भाजपने त्यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री म्हणून नेमण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले आहे.

20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. परंतु भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

अजित पवार मार्च (2022) पासून अमित शहा यांच्या नियमित संपर्कात होते; शिंदे यांच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व 16 आमदारांना अपात्र ठरवतील, त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले जाईल ज्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे रेडिफने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.

Advertisement

Advertisement