महाराष्ट्रात शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसही दोन गटात विभागली गेली आहे. पहिला शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. आपली ताकद दाखवण्यासाठी दोघांनी उद्या (बुधवार) बैठक बोलावली आहे. अजित पवार यांनी २ जुलै रोजी ८ आमदारांसह शपथ घेतल्यानंतर अजित पवार आणि उर्वरित बंडखोरांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती.
मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित यांनी मंगळवारी मुंबईतील मंत्रालयासमोरील त्यांच्या नवीन पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील केले. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही हजेरी लावली.
दरम्यान अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.
अजित पवार लवकरच म्हणजे याच वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असा दावा अजित पवार यांच्या गटातील प्रवक्ते, आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
याला आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असेल की नाही माहित नाही पण अजित पवार याच वर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. मिटकरी यांनी साम टिव्हीला याबाबच माहिती दिली आहे.