शरद पवारांना आव्हान देत अजित पवार यांनी बंड केलं. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा तिसरा भूकंप आहे असं बोललं जातं आहे. कारण २ जुलै २०२३ या दिवशी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील या दिग्गजांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या बंडाच्या दोन दिवस आधीच शरद पवारांविषयी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“शरद पवार यांचं वय झालं असलं तरीही ते अजून फिट आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या या वयातही राजकारणाविषयी ते प्रचंड सतर्क आहेत. देशातल्या अशा राजकारण्यांमध्ये शरद पवारांची गणना होते ज्यांना राजकारण मूळापासून माहित आहे. प्रत्येक फॅमिली पार्टीप्रमाणे शरद पवारांनाही हे वाटतं की आपला वारसा पुढे चालावा. त्यामुळेच तर त्यांनी सुप्रिया सुळेंना पुढे केलं आहे. जर शरद पवारांना बॅकफूटवर जायचं असतं तर त्यांनी सुप्रिया सुळेंना किमान प्रदेशाध्यक्ष केलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केलं आहे. मात्र अशी कुठलं पदच नाही. प्रफुल्ल पटेल यांनाही हे पद देण्यात आलं आहे. मात्र आपला वारसा पुढे चालावा याच्या तयारीची ही सुरुवात आहे.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच आहेत, राष्ट्रवादी पक्ष शरद पवारच चालवत आहेत. तसंच जी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न होतो आहे त्याचे ‘चालक’ही शरद पवारच आहेत. तसंच सगळ्या विरोधकांना एकत्र आणण्याची जे कधी एकमेकांचं तोंडही बघत नाही त्यांना समोर बसवण्याची क्षमता त्यांच्यातच आहे.